शिवतेज खराडेसह अकराजणांना अटक पापा बोंद्रे रुग्णालयात?: फुटबॉल सामना मारहाण प्रकरण
By admin | Published: May 11, 2014 12:39 AM2014-05-11T00:39:55+5:302014-05-11T00:41:32+5:30
कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान
कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान परदेशी फुटबॉलपटू व्हिक्टर जॅक्सन याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज (शनिवार) माजी महापौर सई खराडे यांचा मुलगा शिवतेज खराडे याच्यासह अकराजणांना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी महिपतराव ऊर्फ पापा बोंद्रे यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले असता ते सापडले नाहीत. त्यांचा शोध सुरू असून, ते खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी दिली. व्हिक्टर जॅक्सन हा बुधवारी फुटबॉल प्रीमिअर लीग २०१४ स्पर्धेचा साखळी सामना खेळत असताना रात्री नऊच्या सुमारास पापा बोंद्रे, त्यांचा नातू शिवतेज यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांना त्याला बेदम मारहाण केली व सामना बंद पाडला. या प्रकरणी शिवप्रसाद मालोजीराव भोसले यांनी फिर्याद दिल्याने जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी संशयित आरोपी पापा बोंद्रे यांच्यासह अन्य आरोपींच्या घरांची झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत. आज पुन्हा शोधमोहीम राबविली असता अकराजण मिळून आले. त्यामध्ये शिवतेज इंद्रनील खराडे (वय २०), श्रीकांत पांडुरंग भोसले (५७), विक्रांत आनंद शेटे (२२), संजय आनंदराव पाटील (४५), केतन किरण जाधव (२२), अजित तानाजी इंगवले (२४, सर्व रा. शिवाजी पेठ), राजेंद्र दत्तात्रय सरनाईक (४२), शिवराज प्रकाश राणे (२९, दोघे रा. फुलेवाडी), संजय ज्ञानदेव लांबोरे (४४, रा. आपटेनगर), विनोद विलास सरनाईक (२३, रा. कुंभार गल्ली), इरफान शौकत मुलाणी (२५, रा. रंकाळा चौपाटी), आदींचा समावेश आहे. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)