अखंड राहो लक्ष्मी तुझा वास - लक्ष्मीपूजन झाले थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 06:26 PM2020-11-14T18:26:40+5:302020-11-14T18:33:25+5:30

लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, पुढे धण्याची रास, तांब्यावर श्रीफळाच्या रूपात प्रतिष्ठित झालेली देवी, झेंडूची फुलं, विद्युत रोषणाईची आरास, फराळ-पंचपक्वान्नांचा नैवेद्य, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी, मांगल्याचे सार, दारात सजलेली रांगोळी, विद्युत रोषणाई आणि सजावटीच्या साहित्याने सजलेले घर अशा प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात शनिवारी सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजन झाले. यानिमित्ताने घराघरांत आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा झरा ओसंडून वाहत होता.

Akhand raho lakshmi tuja waas | अखंड राहो लक्ष्मी तुझा वास - लक्ष्मीपूजन झाले थाटात

अखंड राहो लक्ष्मी तुझा वास - लक्ष्मीपूजन झाले थाटात

googlenewsNext
ठळक मुद्देअखंड राहो लक्ष्मी तुझा वास लक्ष्मीपूजन झाले थाटात

कोल्हापूर : लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, पुढे धण्याची रास, तांब्यावर श्रीफळाच्या रूपात प्रतिष्ठित झालेली देवी, झेंडूची फुलं, विद्युत रोषणाईची आरास, फराळ-पंचपक्वान्नांचा नैवेद्य, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी, मांगल्याचे सार, दारात सजलेली रांगोळी, विद्युत रोषणाई आणि सजावटीच्या साहित्याने सजलेले घर अशा प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात शनिवारी सायंकाळी लक्ष्मी-कुबेर पूजन झाले. यानिमित्ताने घराघरांत आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा झरा ओसंडून वाहत होता.

दिवाळीच्या सहा दिवसांतील उत्सवात लक्ष्मी-कुबेर पूजनाला विशेष महत्त्व आहे. अमावास्येच्या सायंकाळी ही पूजा विधीवत पद्धतीने केली जाते. या पूजेमुळे कुटुंबात अखंड लक्ष्मी, सुखसमृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने महिला वर्गाची मोठी धांदल उडाली. सकाळी अभ्यंगस्नान, कुटुंबातील पुरुषांचे औक्षण आणि दुपारनंतर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली.

शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत, त्यानंतर नऊ वाजून १२ मिनिटांपासून १० वाजेपर्यंत असा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. त्यामुळे दुपारपासूनच घराघरांत दाराला झेंडूचे तोरण लावणे, हार बनवणे, पूजेसाठी पाच फळे, केळी, पान-सुपारी या साहित्याची खरेदी, पूजेच्या मांडणीच्या भांड्यांची स्वच्छता अशी घाई सुरू झाली.

सायंकाळी पुन्हा दारात छान रांगोळी सजली. पूजेची मांडणी आणि आरास झाल्यानंतर सर्वांनी मिळून आरती केली. फराळ आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला. देवतांची प्रतिष्ठापना, धूप-आरती यांमुळे घराघरांत मंगलमय वातावरण होते. लक्ष्मीपूजनानंतर बालचमूने फटाके उडविण्याचा आनंद लुटला.

व्यावसायिकांमध्ये उत्साह

घरांप्रमाणेच व्यावसायिकदेखील आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात, कार्यालयात लक्ष्मीपूजन करतात. आपल्या घरात ज्या व्यवसायामुळे लक्ष्मी येते, तो व्यवसाय लहान असो वा मोठा; त्याबद्दल अतीव श्रद्धा असते. यंदा कोरोनाच्या आठ महिन्यांनंतर दिवाळीच्या निमित्ताने व्यवसायाला उभारी आल्याने व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह होता.
 

Web Title: Akhand raho lakshmi tuja waas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.