हिंमत असेल निवडणुकीला उभारून दाखवा, मेघराज राजेभोसलेंचे विरोधकांना आव्हान
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 14, 2022 07:15 PM2022-09-14T19:15:40+5:302022-09-14T19:16:08+5:30
मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही.
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात चित्रपट महामंडळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. ५ वर्षात १२ कोटींच्या ठेवी, तीन कार्यालये, कोरोनात सभासदांना मदत या गोष्टी अशाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मी पून्हा अध्यक्ष होण्यास पात्र आहे की नाही हे सभासद ठरवतील, या निवडणुकीत पॅनेलचे सगळे १७ उमेदवार निवडून नाही आणले तर मी अध्यक्ष होणार नाही. हिंमत असेल त्यांनी उभारून दाखवावे असे आव्हान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी बुधवारी विरोधकांना दिले.
महामंडळातील अंतर्गत राजकारणावर कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत यावर ते म्हणाले, उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची गुणगाणी सगळ्यांनी पाहिली व ऐकली आहेत त्यांनी केलेल्या आरोपांना मी कचऱ्याची टोपली दाखवतो.
कोरोना संपल्यानंतर वारंवार कार्यवाह सुशांत शेलार यांना सांगूनही त्यांनी कार्यकारिणीची बैठक लावली नाही. दोनवेळा फक्त अध्यक्ष बदलाची चर्चा झाली. खरेतर उपाध्यक्ष धनाजी यमकर, बाळा जाधव यांना बँकेच्या माध्यमातून पैसे हडप करायचे होते तो डाव मी उधळला, महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना मी हवा होतो आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पद हवे आहे. बँकेची खाती गोठवली म्हणून मी त्यांना नको आहे. सभासदांमधील गोंधळाचे वातावरण दूर व्हावे यासाठी निवडणूक जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षातील ऑडीट सुशांत शेलार यांच्या सहीनेच सादर झाले आहेत. यावर्षीचे ऑडीट सुरू आहे. भ्रष्टाचार झाला वाटत असेल तर संबंधितांनी स्वखर्चातून करून घ्यावे.
ज्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांची सविस्तर उत्तरे मी दिली आहेत. बाळा जाधव यांनी कलाकाराचे सभासदत्व बदलून दुय्यम कामगार करून घेतले व पदाधिकारी झाले घटनेत हे मान्य नसताना सभासदांची दिशाभूल केली, ते कायद्याने महामंडळाचे सभासद नाहीत, सर्वसाधारण सभेत कागदपत्रे फेकली, कार्यवाह पदाचा राजीनामा दिला नंतर बेकायदेशीररित्या हेच पद घेतले. त्यांनी व धनाजी यमकर यांनी कोल्हापूर कार्यालय बंद पाडले, यमकर यांनी २ लाखांचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. दाऊ पिऊन गोंधळ घातला. सुशांत शेलार यांनी खासगी बिलं महामंडळाच्या खात्यातून वसूल करण्याचा प्रयत्न केला. मुदत संपल्यानंतर स्वत:ला अध्यक्ष घोषित केले, हे घटनेनुसार बेकायदेशीर आहे. या सगळ्यांच्या आणखीही गोष्टी पुराव्यांसह आहेत त्या योग्यवेळी बाहेर काढले जाईल. यावेळी संजय ठुबे, आकाराम पाटील, अजूर्न नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्यासह चित्रपट महामंडळाचे सभासद उपस्थित होते.