'माढ्या'तून 'धैर्यशील मोहिते-पाटील यांना गळ, महाविकास' देईना जानकरांना बळ

By पोपट केशव पवार | Published: March 16, 2024 06:23 PM2024-03-16T18:23:39+5:302024-03-16T18:24:09+5:30

पोपट पवार कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कमालीची चुरस असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच परत ...

Akluj Dhairyasheel Mohite Patil will contest from Madha Lok Sabha constituency from Mahavikas Aghadi | 'माढ्या'तून 'धैर्यशील मोहिते-पाटील यांना गळ, महाविकास' देईना जानकरांना बळ

'माढ्या'तून 'धैर्यशील मोहिते-पाटील यांना गळ, महाविकास' देईना जानकरांना बळ

पोपट पवार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कमालीची चुरस असलेल्या माढालोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच परत मैदानात उतरवल्याने भाजपची उमेदवारी मिळेल या आशेवर बसलेल्या अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर आता महाविकास आघाडीने 'गळ' टाकला आहे. 'झालं गेलं विसरून जा, 'तुम्ही लढा, सर्व ताकद पुरवू', असा शब्दच शरद पवारांनी मोहिते-पाटील यांना दिल्याचे समजते. त्यामुळे बारामतीपासून दुरावलेले अकलूजकर शरद पवार यांची 'तुतारी' फुंकण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडीकडे 'माढा' मागत रिंगणात उतरण्याची तयारी करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांचे नाव काहीसे मागे पडले आहे.

'रासप'ने 'माढा'सह परभणी व सांगली लोकसभा मतदारसंघ मागितला असून महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेकडून परभणी व सांगली द्यायला नकार दिल्याने रासपने 'महाविकास'मध्ये सहभागी न होता स्वतंत्र रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याच शिडात हवा भरत एकास एक लढत देण्याची खेळी शरद पवार गटाने सुरू केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यावर विजय मिळवला होता. या विजयात मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्याने एक लाखाहून अधिकचे मताधिक्य देत मोलाची भर घातली होती. शिवाय, माढा, करमाळा या तालुक्यातील मोहिते-पाटील यांचा गट निंबाळकर यांना गुलाल लावण्यासाठी राबला होता. हाच धागा पकडत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, पक्षाने पुन्हा खासदार निंबाळकर यांच्यावरच विश्वास दाखविल्याने मोहिते-पाटील यांनी बंडाची तयारी चालविली आहे. यातूनच ते शरद पवार गटाची 'तुतारी' हातात घेण्याच्या तयारीत आहेत.

रामराजेंंची मिळेल साथ

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे सध्या महायुतीत असले तरी मोहिते-पाटील परिवाराशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. रणजितसिंह निंबाळकर व रामराजे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे मोहिते-पाटील 'महाविकास'कडून मैदानात उतरले, तर रामराजेंची त्यांना साथ मिळू शकेल. शिवाय, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, सांगोला व करमाळा या तालुक्यांत मोहिते-पाटलांचा गट अद्यापही शाबूत आहे. त्यामुळेच मोहिते-पाटील परिवारातील उमेदवारी विजयश्री मिळवून देऊ शकते या विश्वासार्हतेतूनच शरद पवार गटाने दुरावलेल्या अकलूजकरांशी पुन्हा जवळीकता साधली आहे.


महाविकास आघाडीकडे माढा, परभणी व सांगली हे तीन मतदारसंघ मागितले होते. त्यातील माढा मतदारसंघ मला सोडण्यास शरद पवार यांनी होकार दिला. पण, उर्वरित दोन्ही मतदारसंघ सोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस काहीच बोलत नाहीत. त्यामुळे चार दिवस वाट पाहू, अन्यथा रासप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. - महादेव जानकर, संस्थापक अध्यक्ष, रासप.

Web Title: Akluj Dhairyasheel Mohite Patil will contest from Madha Lok Sabha constituency from Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.