SSC Result: वडिलांचे स्मशानभूमीत काबाटकष्ट, 'अक्षय'ने दहावी परीक्षेत मिळवलं यश लखलखत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:09 PM2022-06-18T12:09:20+5:302022-06-18T12:10:39+5:30
जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य बघत त्यांनी कष्ट केले. अक्षयने वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
कोल्हापूर : वडील कदमवाडीतील स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्कार करतात, आपल्यासारखे आयुष्य मुलाच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. जळणाऱ्या प्रेताच्या प्रकाशात आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य बघत त्यांनी कष्ट केले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अक्षय प्रशांत सुरगोंड याने दहावी परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळवत या कष्टाचे चीज केले.
प्रशांत सुरगोंड हे कोल्हापूर महापालिकेच्या कदमवाडीतील स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्काराची कामे करतात. अगदी तुटपूंज्या पगारावर सेवाभावी नोकरी करतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केेले नाही. आई प्रेमा सुरगोंड या घरकामाबरोबरच लहान मोठी कामे करून पतीला हातभार लावतात.
अक्षयला जुळी बहिण आहे. ती पद्माराजेमध्ये हायस्कूलमध्ये होती. तिला ७८ टक्के गुण मिळाले. दोघांनीही खासगी क्लास लावलेला नव्हता. शेवटच्या तीन महिन्यात एका सरांकडे ट्युशनला जात होते. अभ्यास मात्र रात्रंदिवस करत होते. दोन्ही मुलांच्या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले.