जोतिबा डोंगरावर ‘चांगभलं’चा गजर

By admin | Published: April 10, 2017 12:57 AM2017-04-10T00:57:23+5:302017-04-10T00:57:23+5:30

आज मुख्य दिवस : लाखो भाविक दाखल

The alarm of 'Changbhal' on Jyotiba Mountain | जोतिबा डोंगरावर ‘चांगभलं’चा गजर

जोतिबा डोंगरावर ‘चांगभलं’चा गजर

Next



कोल्हापूर/ जोतिबा : ‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला रविवारी प्रारंभ झाला. आज, सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. रविवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच डोंगरावर तीन लाख भाविकांनी उपस्थिती लावली. रात्रभर भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहिल्या. कुशिरे, पोहाळे, वडणगे, निगवे, केर्ली, गिरोली या गावांतून डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले.
कोल्हापूर पंचगंगा नदी ते गायमुख तलावमार्गे जोतिबा डोंगरपर्यंत सोलापूर, बार्शी, लातूर, बीड, उस्मानाबाद या भागातील भाविकांनी सासनकाठी खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला. रविवारी सायंकाळी मानाची निनाम पाडळी (जि. सातारा), किवळ (कऱ्हाड), मौजे विहे (ता. पाटण, सातारा), कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) या मानाच्या सासनकाठ्यांचे यमाई मंदिरात मिरवणुकीने आगमन झाले. उन्हाच्या तडाख्यामुळे भक्तांनी सावली धरून आडोसा घेतल्याचे चित्र होते.
लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता, पोलिस दलाने नियमित बंदोबस्तासह दहशतवादविरोधी पथकाची एक मोठा स्क्रीन असलेली गाडी तैनात केली आहे. याशिवाय सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असलेली सर्र्व्हेलियन्स व्हॅनही सेंट्रल प्लाझा येथे तैनात केली आहे. आज मंदिर दर्शनासाठी दिवस-रात्र खुले राहील.
मानाच्या सासनकाठ्यांची पूजा
ज्योतिर्लिंग ट्रस्टची मौजे पाडळी (निनाम) खटाव, जि. सातारा, सिंदीया देवस्थान ट्रस्ट, ग्वाल्हेर; बबन पाटील मौजे विहे (ता. पाटण, सातारा), संग्रामसिंह चव्हाण यांची कसबे डिग्रज (ता. मिरज, सांगली), हिम्मतबहाद्दूर चव्हाण (मौजे निगवे, ता. करवीर), उदाजीराव चव्हाण (करवीर), प्रतापराव माने (कसबा सांगाव, ता कागल), संत नावजीनाथ व ज्योतिर्लिंग भक्त मंडळ (किवब, ता. कराड, सातारा), कडीब जरी-फेटा ( मौजे वाडी रत्नागिरी ) या मानाच्या सासनकाठ्यांची पूजा भालदार-चोपदारांसह केदारलिंग देवस्थानचे व्यवस्थापक लक्ष्मण डबाणे यांच्या हस्ते झाली. ९० सासनकाठ्यांसह, उंट, तोफ, आदींसह लवाजम्यासह १८ मानाच्या अशा १०८ सासनकाठ्या आजच्या मुख्य यात्रेत मंदिर परिसरात मिरवणुकीने नाचविण्यात येणार आहेत.
पंचगंगा घाटावर स्नानाची परंपरा
जोतिबा डोंगरावर देवदर्शन करण्यासाठी जाण्यापूर्वी कोल्हापुरात पंचगंगा घाटावर भाविकांनी स्नान करून देव्हाऱ्याच्या टाकांचे पूजन करून डोंगरावर जाण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. रविवारी दिवसभर पंचगंगा नदीघाटावर स्नान करण्यासाठी तसेच देवाचे टाक पूजन करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.

Web Title: The alarm of 'Changbhal' on Jyotiba Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.