बनावट नोटाप्रकरणी आलासच्या तरुणास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:25 PM2021-05-27T18:25:18+5:302021-05-27T18:27:09+5:30
Court Kolhapur : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय २७, रा. आलास, ता. शिरोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
कोल्हापूर : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय २७, रा. आलास, ता. शिरोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दुसरा संशयित आरोपी जमीर अब्दुलकादर पटेल (वय ३२, रा. आलास) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील पी. जे. जाधव यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : विश्वास कोळी व जमीर पटेल यांना गांधीनगरमध्ये वळीवडे रेल्वेस्टेशन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दि. १९ मार्च २०१८ रोजी रात्री छापा टाकून पकडले. त्यांच्याकडे १००, २०० व २००० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. चौकशीत कोळी याने या सर्व बनावट नोटा आलास (ता. शिरोळ) येथे आपल्या राहत्या घरी कलर झेरॉक्स प्रिंटरवर छापल्याचे कबूल केले.
पोलिसांनी त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कलर झेरॉक्स प्रिंटर, कागदाची रिम, कात्री, बनावट नोटा असे साहित्य जप्त केले होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस हे. कॉ. विजय कारंडे यांनी फिर्याद दिली होती. तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. तानाजी सावंत व तत्कालीन पो.नि. दिनकर मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
सुनावणीत सहा. सरकारी वकिलांनी १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जप्त मुद्देमालाचा मुंबई व नाशिकहून आलेला तपासणी अहवाल, पंच तसेच तपासी अधिकाऱ्र्यांच्या साक्ष, सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यानुसार विश्वास कोळी याला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी जमीर पटेल याची निर्दोष मुक्तता केली. याकामी सहा. उपनिरीक्षक एम. एम. नाईक, हे, कॉ. आनंदा शिंदे (गांधीनगर) किरण गावडे(एलसीबी) यांचे सहकार्य लाभले.