कळंबा तलावावर मद्यपींचा उच्छाद
By Admin | Published: January 2, 2017 12:14 AM2017-01-02T00:14:34+5:302017-01-02T00:14:34+5:30
३१ डिसेंबरची नशा : सिमेंट बाकडी, ट्री गार्डची तोडफोड, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
कळंबा : नववर्षाचे स्वागत आणि ३१ डिसेंबरचा जल्लोष साजरा करण्याच्या बहाण्याने आलेल्या मद्यपी टोळीने शनिवारी मध्यरात्री कळंबा तलाव परिसरात तोडफोड करीत नुकसान केले. तसेच रिकाम्या दारूच्या बाटल्या फोडत धिंगाणा घातला. मद्यपींच्या या धिंगाण्याचा नागरिकांनी निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.
कळंबा तलावातील सांडवा परिसरात दररोज फिरावयास येणाऱ्या नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी लोकवर्गणीतून बसविण्यात आलेल्या १५ सिमेंटच्या बाकड्यांची तसेच तलाव परिसरात लावलेल्या दहा झाडांच्या ट्री गार्डची नासधूस करण्यात आली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या करण्यासाठी ३१ डिसेंबरला तलाव परिसरात गर्दी होती. दारूच्या नशेत असणाऱ्या टोळक्याने हुल्लडबाजी करत सांडवा परिसरातील सिमेंटची बाकडी, ट्री गार्डचे नुकसान केले. प्रतिवर्षी मद्यपींकडून तलावाचे नुकसान होते. तलाव परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी परिसरात पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती, पण त्यांची प्रशासनाने फारशी दखल घेतली नाही. तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ करवीर पोलिस स्टेशनचे पोलिस मदत केंद्र आहे. तरीही मद्यपींकडून कृत्य घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)