दारू-जुगारही हद्दपार!
By Admin | Published: October 4, 2015 09:48 PM2015-10-04T21:48:59+5:302015-10-05T00:17:56+5:30
डॉल्बीनंतर आता तडवळे (सं) वाघोली : ग्रामसभेत एकमुखी निर्णय
वाठार स्टेशन : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तडवळे (सं) वाघोली गाव डॉल्बीमुक्त करण्याबरोबरच गावातून दारु व जुगार हद्दपार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तर पिंपोडे बुद्रुकमध्ये दारुबंदीवरुन सत्ताधारी व गावातील तरुणांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
सरपंच नलिनी भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गाव डॉल्बीमुक्त व्हावे, असा ठराव खुद्द सरपंच नलिनी भोईटे यांनी मांडला. याला भगवानराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. यानंतर हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच गावहद्दीत असलेली सर्व दारु दुकाने व जुगार अड्डे बंद करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. गाव टॅँकरमुक्त करण्याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी उपसरपंच अजित भोईटे, सदस्य विजय भोईटे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव भोईटे, सदस्य दत्तात्रय ठोंबरे, कल्पना बडेकर, अमोल चव्हाण, निलेश भोईटे, पांडुरंग भोईटे, ग्रामसेवक नवनाथ शिरसागर ग्रामस्थ मोेठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामसभेत डॉल्बीबंदीचा ठराव यापूर्वीच मंजूर केला होता. याबाबत मंडळाच्या कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत युवकांना या ठरावावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. गावात डॉल्बीबंदी असतानाही डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळांविरोधात दंडात्मक कारवाई करावी किंवा त्यांना ग्रामस्वच्छता करायला लावावी, असा आग्रह तरुणांनी धरला. यावर एका माजी सरपंचांनी माफी मागतली. यानंतर या ठरावास संबंधित युवकांनी संमती दिली.
सरपंच मच्छिंद्र केंजळे, उपसरपंच जनार्दन निकम, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर साळुंखे, जयेंद्र लेंभे, अशोकराव लेंभे, चंद्रकांत निकम, दौलतराव लेंभे, शांताराम निकम, नरेंद्र वाघांबरे, महेश मोहटकर, लक्ष्मण साळुंखे ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी ठरावाचे वाचन केले. (वार्ताहर)
पिंपोडेतील दारुबंदीसाठी १२ रोजी सभा
गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारुबंदीबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकत्यांनी केली. मात्र, यासाठी गावातील सर्वांनी एकत्रित येऊन ही मोहीम राबवावी, असे मत संजय साळुंखे यांनी मांडले. यासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्यावरुन जोरदार खलबते झाली. शेवटी दारुबंदीबाबत १२ आॅक्टोबर रोजी विषेश ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.