पाचगावात गल्ली-बोळात दारूची झिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:54+5:302021-02-27T04:29:54+5:30
पाचगाव : एकीकडे पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रीवर करडी नजर ठेवून असले तरी पाचगावात मात्र हा नियम पोलिसांकडून गुंडाळला ...
पाचगाव : एकीकडे पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रीवर करडी नजर ठेवून असले तरी पाचगावात मात्र हा नियम पोलिसांकडून गुंडाळला गेला आहे. पाचगावमध्ये गल्ली-बोळातही अवैध दारूची राजरोसपणे विक्री होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पाचगावात खुलेआम दारू मिळत असल्याने अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन दिवसभर गल्ली-बोळात झिंगत असल्याचे चित्र आहे. पाचगावमध्ये अनेक छोट्या-मोठ्या कॉलन्या अलीकडच्या काळात उदयास आल्या आहेत. यातील बहुतांश कॉलन्यामध्ये दारूचे गुत्ते आहेत. राजरोसपणे चाललेल्या या व्यवसायामुळे येथील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडूनही या अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
चौकट: गुटखा, मटकाही तेजीत : आर. के. नगर. परिसरात गुटखा व मटका खुलेआम चालिवला जात आहे. विशेष म्हणजे या भागात पोलीस चौकी असूनही अवैध व्यवसायाला का आळा बसत नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून जुजबी कारवाई होत असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांना भीती राहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अवैध व्यवसायावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तरुणाई जाळ्यात : दारू, गुटखा आणि मटक्याच्या आहारी जाण्याचे तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. सामान्य कुटुंबाबरोबरच मोठ्या घरातील धेंडेही या व्यसनात पुरती बुडाली आहेत. त्यातूनच रात्रीच्या वेळी पाचगाव परिसरातील रस्त्यांवर अनेकवेळा वादाचे प्रकार घडत आहेत.