दारू वाहतूक ; एक ताब्यात
By admin | Published: February 17, 2017 11:42 PM2017-02-17T23:42:33+5:302017-02-17T23:42:33+5:30
हातकणंगलेमधील युवक : इन्सुलीत कारवाई, ५७ हजारांच्या दारूसह टेम्पो जप्त
बांदा : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने छोट्या टेम्पोमधून होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करत इन्सुली खांबदेव नाका येथे कारवाई करत ५७ हजार ८0 रुपये किंमतीच्या दारुसह ५ लाख ५७ हजार ८0 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी चालक नितिन ज्ञानदेव वासुदेव (२५, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले, कोल्हापूर) याच्यावर अटकेची कारवाई केली.
दरम्यान, २१ ला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी नाक्यावर कडक यंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशीरा करण्यात आली. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते आपले सहकारी हवालदार यमणप्पा वडर, दत्ता देसाई, उदयसिंह खांडेकर यांच्यासह मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी गोव्याहूून बांद्याच्या दिशेने येणारा टेम्पो (एमएच 0९ सीयु ६९६५) चालकाला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने गाडी न थांबविता तेथून सुसाट वेगात इन्सुलीच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. बांदा तपासणी नाक्यावर गाडीला थांबविण्याचा इशारा करण्यात आला असता तेथूनही चालकाने पलायन केले.
बांदा पोलिसांनी अखेर इन्सुली खांबदेव नाक्यापर्यंत पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतले. गाडीच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्डची दारु बेकायदा आढळली. पोलिसांनी ५७ हजार ८0 रुपयांची दारु व पाच लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. अधिक तपास बांदा पोलीस करीत
आहेत. (प्रतिनिधी)