लॉकडाऊनमध्ये सगळे बंद पण दारू विक्री मात्र जोरात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:01+5:302021-05-22T04:23:01+5:30
कोल्हापूर : गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे कडक लॉकडाऊनमध्ये सुमारे शंभर दिवस गेले. त्यात महसुलाचा मोठा स्त्रोत ...
कोल्हापूर : गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे कडक लॉकडाऊनमध्ये सुमारे शंभर दिवस गेले. त्यात महसुलाचा मोठा स्त्रोत आणि मद्यपींचा मोठा आधार असलेल्या मद्य विक्रीतही काही प्रमाणत घट झाली. २०१९ च्या तुलनेत यावर्षी १४ लाख लीटरने दारू विक्री कमी झाली आहे. आता दुसऱ्या लाटेमध्ये मद्यपींची सोय म्हणून होम डिलिव्हरी आणि पार्सलची सुविधा देण्याची मुभा दुकानदारांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. त्यामुळे २०२०-२१ या काळात २ कोटी १९ लाख लीटर दारूची विक्री झाली. यात देशी, विदेशी आणि बिअरचा समावेश आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही हाच फॉम्युला अवलंब केल्यामुळे दारूसाठी मद्यपी रस्त्यावर येण्याचे प्रमाण घटले असून महसूलही नियमितपणे राज्य शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मद्यपीं दारू न मिळाल्याने सैरभेैर झाले होते. अनेकांनी बनावट मद्याची विक्रीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तो हाणून पाडत कारवाईचा बडगा उगारला. वर्षभरात ७५ टक्के लॉकडाऊनचाच काळ गेला. मिळेल त्या प्रमाणात दारू खरेदी करण्याचा मोह मद्यपींना आवरला नाही. त्यातून कररूपाने शासनाला २२२ कोटींचा महसूल मिळाला.
सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत होम डिलिव्हरीसह पार्सलची सुविधा दुकानदारांकडून उपलब्ध करून दिली. त्यामुळे महसुलाबरोबर मद्यपींची सोय असा दुहेरी हेतुही साध्य झाला. मद्यपी दारूसाठी बाहेर पडण्याचे प्रमाणही घटले.
दोन वर्षातील मद्य विक्री लीटरमध्ये अशी,
प्रकार २०१९-२० २०२०-२१
देशी १ कोटी ८ लाख ६४ हजार : १ कोटी ३ लाख ७६ हजार
विदेशी ६९ लाख ५८ हजार : ६९ लाख २८ हजार
बिअर ५९ लाख ९७ हजार : ४५ लाख ९९ हजार
एकूण २ कोटी ३३ लाख १९ हजार : एकूण २ कोटी १९ लाख ३ हजार
बिअरची मागणी घटली ; देशी-विदेशीत वाढ
सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात थंडगार म्हणून बिअरला युवा वर्गाकडून मोठी मागणी असते. पण २०२०-२१ च्या काळात त्याच्या विक्रीत तब्बल १३ लाख ९८ हजार लीटरने घट झाली आहे. देशीमध्ये ५ लाख १० हजार लीटर व विदेशी दारूमध्ये ३० हजार लीटरचा खपात फरक पडला आहे.
महसुलास आधार
मद्यपान शरीरास अपायकारक आहे हे खरे असले तरी २०२०-२१ या सालात त्याच्या विक्रीतून कराच्या रुपाने सरकारी तिजोरीत तब्बल २२१ कोटी ९९ लाखांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी २०१९-२० च्या तुलनेत हा महसूल कमी आहे. मागील वर्षी ३२८ कोटी ८७ लाख इतका महसूल मिळाला होता.
वर्षभरात १ कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
२०२०-२१ या काळात १७८१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात १२६९ जणांचा समावेश होता. तर बेवारस म्हणून ५१२ केसेस पुढे आल्या. या सर्व कारवाईत १२९५ संशयितांना अटक करण्यात आली. तर ८२१.५९ लीटर (विदेशी), ३७०९.७९ लीटर (देशी) दारू जप्त करण्यात. याशिवाय परराज्यातून येणारा विदेशी बनावटीचा १०४९१ .०५ लीटरचा साठाही जप्त करण्यात आला. या कारवाईत १४० वाहने जप्त करीत १ कोटी ८८ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागास यश आले.
कोट
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून शासनाने होम डिलिव्हरीसह पार्सल सुविधेला मान्यता दिली. त्यामुळे महसुलात वाढ झाली. या काळात कोणत्याही परिस्थितीत महसूल बुडू नये, याकरीता चोवीस तास कर्मचारी सतर्क आहेत.
जयसिंग जाधव,
प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर