दिवसभर गाठीभेटी, जोडण्यांचा रविवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:03 AM2019-04-08T01:03:22+5:302019-04-08T01:03:27+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार मध्यावर आला असून, विविध गटांनी भूमिका जाहीर केल्याने प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. रविवारी ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार मध्यावर आला असून, विविध गटांनी भूमिका जाहीर केल्याने प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. रविवारी उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्ते दिवसभर मतदारसंघात गाठीभेटी, तर सायंकाळी जाहीर सभा घेत आहेत. मतदान २३ एप्रिलला होत आहे, तत्पूर्वी आणखी दोन रविवार मिळणार असले तरी सुट्टीचा फायदा उठवीत सर्वच उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सक्रिय केली. महाडिक यांनी करवीर, प्रा. मंडलिक यांनी शहरात, राजू शेट्टी यांनी पन्हाळ्यात, तर धैर्यशील माने यांनी शाहूवाडीत दिवसभर तळ ठोकला.
कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व राष्टÑवादी आघाडीचे धनंजय महाडिक, तर हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने व आघाडीचे राजू शेट्टी यांच्यात सरळ लढत होत आहे. युती व आघाडीच्या प्रचारास सुरुवात होऊन महिना झाला असला तरी अंतर्गत रूसव्या-फुगव्यात बराच कालावधी गेला. शिवसेना-भाजप लवकर एकसंधपणे प्रचारात उतरल्याने सध्यातरी प्रचारात त्यांची आघाडी दिसते. धनंजय महाडिक यांनी स्वत:च्या यंत्रणेने दोन महिन्यांपासून मतदारसंघात राबता ठेवला आहे; पण राष्टÑवादी व कॉँग्रेस अंतर्गत नाराजी दूर करण्यात त्यांना ताकद खर्च करावी लागली. आता दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाची प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचे काम सुरू आहे. सुट्टीदिवशी बहुतांशी मतदार घरी भेटत असल्याने हा दिवस उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो; त्यामुळे रविवार हा प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. मतदानासाठी अजून १६ दिवस आहेत, तोपर्यंत अजून दोन रविवार प्रचारासाठी मिळणार आहेत. तरीही मिळालेल्या रविवारचा फायदा करण्यासाठी उमेदवारांनी सकाळपासूनच नियोजन केले होते. ते यशस्वी केले.
मंडलिक यांची शहरात पदयात्रा
प्रा. संजय मंडलिक यांनी रविवार सुट्टी म्हणून अखंड दिवस कोल्हापूर शहरात घालविला. सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत रंकाळा टॉवर, गंगावेश परिसरात पदयात्रा काढली. त्यानंतर शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी येथे पदयात्रा काढत गाठीभेटी घेतल्या.
दुपारी चार वाजता शिवाजी पेठेत बैठक, सायंकाळी सहा वाजता संभाजीनगर येथे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या महिला मेळाव्यास उपस्थित राहिले. बजाप माजगावकर तालीम व उमा टॉकीज परिसरात कॉर्नर सभा घेतल्या.
माने यांनी दिवस
घालविला शाहूवाडीत
धैर्यशील माने यांनी सकाळी बांबवडेपासून प्रचारास सुरुवात केली. व्यक्तिगत गाठीभेटी घेत मतदारांशी संपर्क मोहीम राबविली. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या समवेत नांदगाव, घुंगूर, खोतवाडी, पिशवी परिसरात त्यांनी बैठका घेतल्या. सायंकाळी शित्तूरपैकी मलकापूर येथे सभा घेतली.
महाडिक यांची मिसळ पे चर्चा
धनंजय महाडिक यांनी सकाळी कोल्हापूर शहरात तीन ठिकाणी मिसळ पे चर्चा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी १२ वाजता ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांच्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिले. तेथून त्यांनी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासमवेत सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांत गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी सहा वाजता युवक मेळाव्यास ते उपस्थित राहिले.
शेट्टी यांनी घेतला अंदाज : राजू शेट्टी यांनी सकाळी आठपासून दुपारपर्यंत पन्हाळा तालुक्यातील वारणानगर, कोडोलीसह परिसरात तळ ठोकला होता. त्यांनी तिथे विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंदाज घेतला. दुपारी तीननंतर त्यांनी वडगाव, इचलकरंजीत गाठीभेटी घेतल्या. सायंकाळी हुपरी येथे सभा घेतली.