पूरग्रस्तांना सर्व सुविधा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:18+5:302021-07-26T04:23:18+5:30
निपाणी : कर्नाटक राज्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्या कुटुंबांना ...
निपाणी : कर्नाटक राज्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना पूर्ण सोयी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिले. येडीयुरप्पा यांनी रविवारी कोडणी, यमगर्णी येथील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री आर. अशोक, आमदार महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ उपस्थित होते. येडीयुरप्पा यांनी कोडणी येथील पूरस्थितीची पाहणी करून यमगर्णी येथील राष्ट्रीय महामार्ग व गंजी केंद्राला भेट दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महापुरामुळे जे नुकसान झाले आहे त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांमार्फत नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश आपण दिले आहेत. लवकरच नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर तत्काळ नुकसानभरपाई पूरग्रस्तांना दिली जाणार आहे, तसेच गंजी केंद्रांना कोणत्याही सुविधा कमी पडू देऊ नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम.पी पाटील, संचालक समित सासणे, अविनाश पाटील, प्रांताधिकारी युकेश कुमार, तहसीलदार प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
मंत्री ज्वोल्ले यांची अनुपस्थिती
निपाणी मतदारसंघातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आले असताना निपाणी मतदारसंघाच्या आमदार व मंत्री शशिकला ज्वोल्ले यांची अनुपस्थिती होती.
फोटो : यमगर्णी येथील पूरस्थितीची मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पाहणी केली.