शिवसेनेसह पाचही पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांत राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:54+5:302021-06-22T04:17:54+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे राजीनामे दिल्यानंतर हालचाली वेगावल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील ...

All five office bearers including Shiv Sena resigned in two days | शिवसेनेसह पाचही पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांत राजीनामे

शिवसेनेसह पाचही पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांत राजीनामे

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे राजीनामे दिल्यानंतर हालचाली वेगावल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील हे देखील सक्रिय झाले असून, त्यांनी इतर दोनही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पाचही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल आता दृष्टिक्षेपात आला आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर तीनही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत सोमवारी दुसऱ्यांदा कोल्हापुरात आले. दुपारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, संजय पवार, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, अर्जुन आबिटकर , संभाजी पाटील उपस्थित होते. खासदार संजय मंडलिक हे अन्य बैठकांमुळे या ठिकाणी बैठक संपल्यानंतर आले आणि त्यांनी दुधवडकर यांच्याशी चर्चा केली.

यावेळी चर्चा झाल्यानंतर तीनही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दुधवडकर यांच्याकडे सुपूर्त केले. नंतर ते आबिटकर यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुधवडकर म्हणाले, आमच्या तीनही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पंधराव्या वित्त आयोगातील त्यांनी सुचवलेली कामे सध्या अध्यक्षांनी थांबवली आहेत. ती कामे मंजूर झाली की, मग चार दिवसांत राजीनामे अध्यक्षांकडे देण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी अर्जुन आबिटकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

यानंतर तीनही पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले. तोपर्यंत स्वाभिमानीचे राजेश पाटील हे देखील आले. दरम्यानच्या काळात आबिटकर आणि शशिकांत खोत यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील या बुधवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. महिला बालकल्याण आणि आरोग्य समितीची बैठक, काही इतिवृत्ताची पूर्तता यामुळे आणखी दोन ते तीन दिवसांनी राजीनामे देण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला.

चौकट

दुधवडकर-मुश्रीफ यांच्यात चर्चा

अरुण दुधवडकर यांनी दुपारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली. या पदाधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून जी कामे सुचवली आहेत, ती सध्या थांबवली आहेत. ती मंजूर करण्याची अपेक्षा दुधवडकर यांनी व्यक्त केली. दुधवडकर यांनीच ही माहिती दिली.

चौकट

सतीश पाटील गिजवण्याहून दाखल

उपाध्यक्ष सतीश पाटील सोमवारी जिल्हा परिषदेत आले नव्हते. परंतु पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर निरोप गेला. त्यानुसार सतीश पाटील हे साडेसहाच्यादरम्यान जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांचाही राजीनामा अन्य सभापतींसोबत एकदमच होणार आहे.

चौकट

अध्यक्षांच्या दालनात खलबते

अध्यक्ष बजरंग पाटील यांना रात्रीपर्यंत जिल्हा परिषद किंवा बंगल्यावर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी तीननंतर त्यांच्याच दालनात शिवसेनेचे तीन सभापती, स्वाभिमानीचे राजेश पाटील, आबिटकर, खोत, शिंगणापूरचे अमर पाटील यांची बराच वेळ चर्चा सुरू होती. नंतर त्यांना अजिंक्यतारावरून ‘तुम्ही जायला हरकत नाही’ असा निरोप आला.

चौकट

जुलै महिन्यात निवडी

येणाऱ्या बारा दिवसांत राजीनामा प्रक्रिया पार पाडून जुलैमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड घेतली जाणार आहे. सभापतींच्या निवडीनंतर एकच दिवस अंतर ठेवून लगेचच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड घेतली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती घेण्याचे, राजीनाम्याच्या मजकुराची पत्रे तयार करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते.

२१०६२०२१ कोल शिवसेना ०१

कोल्हापुरात शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले. यावेळी डावीकडून सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील, डाॅ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, विजय देवणे, संजय पवार, सुरेश साळोखे, अर्जुन आबिटकर उपस्थित होते.

Web Title: All five office bearers including Shiv Sena resigned in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.