अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमा, कोल्हापुरात चित्रपट व्यावसायिकांचा धर्मादायवर मोर्चा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 22, 2023 07:23 PM2023-12-22T19:23:28+5:302023-12-22T19:24:23+5:30
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अनागोंदी कारभार सुरू असून येथील कामकाज सुधारण्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नियुक्ती करा अशी ...
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अनागोंदी कारभार सुरू असून येथील कामकाज सुधारण्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नियुक्ती करा अशी मागणी करत शुक्रवारी चित्रपट व्यावसायिकांनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. महामंडळातील सावळा गोंधळ, हिशोबाचे घोळ, संचालकांमधील वितंडवाद, अध्यक्ष आणि संचालकांमध्ये नसलेला ताळमेळ, दोन अध्यक्ष, दोन निवडणुका, न्यायालयाची स्थगिती अशा अनेक घडामोडीनंतरही येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत प्रशासकांनी कामकाज पाहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर,यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अध्यक्ष, खजिनदार मनमानी कारभार करत शंकर भेंडेकर, निवडणूक अधिकारी यांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. चार वर्षापूर्वी बंद झालेल्या सावंतवाडी शाखेतील ५० हजार रुपये महामंडळाकडे जमा नाही. कोरोना काळात रोखीने मदत केलेल्या रकमेचा हिशोब अहवालात दाखवलेला नाही, तीन वर्षांत सर्वसाधारण सभा नाही, कार्यकारिणीत खर्च, लेखापरीक्षण अहवालाला मंजूरी नाही.
नवीन घटनेनुसार नवीन पदाधिकाऱ्यांना सह्यांच्या अधिकाराचे ठराव न करता बँक व्यवहार केले आहेत. मुंबई, कोल्हापूर, पुण्यातील जागांची धर्मादायकडे नोंद नाही. पाच सहा कोटींची गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न नाही. सभासदांच्या या पैशाचा जाब विचारण्यासाठी धर्मादायशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करावे. यावेळी सुनिल मुसळे, विजय ढेरे, सागर टेळके, अरुण कांबळे यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.