कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 14, 2022 04:51 PM2022-09-14T16:51:51+5:302022-09-14T16:56:06+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही.
कोल्हापूर : कार्यकारिणीच्या बैठकीत लेखापरीक्षण अहवाल मांडणे, त्यात तो मंजूर होणे, सर्वसाधारण सभा या सगळ्या प्रक्रियांना बगल देत आज, बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अधिकारात मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रशांत पाटील यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यानुसार २० नोव्हेंबरला मतदान व २२ तारखेला निकाल जाहीर होईल.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. त्यातच मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीने मेघराज यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडले. त्यामुळे वाद आणखीच चिघळला, महामंडळाचे कामकाज ठप्प झाले.
निवडणूक होऊन कामकाज सुरळित चालावे यासाठी मागील महिन्यात सभासदांनी महामंडळावर मोर्चा काढला होता. अखेर बुधवारी दुपारी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संजय ठुबे, ॲड. प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.