चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे स्वागत: रविवारी दीक्षाग्रहण उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:33 PM2019-02-04T18:33:27+5:302019-02-04T18:35:52+5:30
‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ही रॅली जाऊन सायंकाळी हॉकी स्टेडियमजवळील शत्रुंजय सोसायटी येथे गेली. येथे या दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. रॅलीत जैन समाजातील युवक, युवती, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कोल्हापूर : ‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ही रॅली जाऊन सायंकाळी हॉकी स्टेडियमजवळील शत्रुंजय सोसायटी येथे गेली. येथे या दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. रॅलीत जैन समाजातील युवक, युवती, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सुरत येथील ज्येष्ठ नागरिक नटवरभाई (वय ६९) व अहमदाबाद येथील वत्सलकुमार (२२) व त्यांची बहीण काव्याकुमारी (२०) व पुण्याची जीनलकुमारी (२०) हे चारजण जैन धर्माची दीक्षा रविवारी (दि. १०) ग्रहण करणार आहेत. सिद्धी-भंद्रकर प्रवज्या समितीतर्फे नॉर्थ स्टार रुग्णालय पाठीमागील भक्तिपूजानगर येथे हा दीक्षा ग्रहण उत्सव होणार आहे. दीक्षा ग्रहण रविवारी पहाटे ५.३० वा. होणार आहे.
समस्त जैन बांधवांनी चार दीक्षार्थींचे भव्य स्वागत कोल्हापूर शहरातून चारचाकी, दुचाकी रॅली काढून केले. रॅलीत युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वेतून सोमवारी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या दीक्षार्थींचे आगमन झाले. यावेळी दीक्षार्थींची ओवाळणी करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी महापौर सरिता मोरे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक ईश्वर परमार, नगरसेविका पूजा नाईकनवरे, स्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडिस, चंद्रकांत कालेकर, एस. व्ही. देशपांडे, ए. आर. हरेल, आदींनी त्यांचे स्वागत केले.
या दीक्षार्थींना घेऊन जैन बांधवांनी व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकिजमार्गे शत्रुंजय सोसायटीपर्यंत भव्य रॅली काढली. यावेळी दसरा चौकात मुस्लिम बोर्डिंगतर्फे दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. अहमदाबाद जिल्ह्यातील धिओन येथील गुरुकुलच्या ८० विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे आणले होते. ते येथील दीक्षा ग्रहण उत्सवासाठी आले आहेत.
दीक्षा ग्रहण उत्सव बुधवारपासून
दीक्षा ग्रहण उत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जैन बांधवांतर्फे करण्यात आले आहे.