‘चांदी’ कलाकुसरीत सर्वपरिचित हुपरी
By Admin | Published: June 5, 2017 12:05 AM2017-06-05T00:05:01+5:302017-06-05T00:05:01+5:30
‘चांदी’ कलाकुसरीत सर्वपरिचित हुपरी
तानाजी घोरपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हुपरी : रौप्यनगरी हुपरी म्हटले की आपल्या नजरेसमोर येतात ते नखशिखांत कलाकुसर केलेले व मनाला भुरळ घालणारे चांदीचे दागिने. अतिशय सुंदर, सुबक कलाकुसरीच्या चांदीच्या वस्तू केवळ हुपरीकरांनीच बनवाव्यात असा जणू संकेतच पडला आहे .सौंदर्यदृष्टीने पारंगत कलारसिकाला येथील दागिने भुरळ तर घालतातच शिवाय मनातील रसिकत्वही जागे केल्याशिवाय राहत नाहीत. येथील चांदी व्यावसायिकांनी आतापर्यंत अनेक अडचणींना, समस्यांना सामोरे जात जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व परिश्रमाच्या जोरावर हा व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.
हुपरी व परिसरातील गावातील चांदी उद्योगाने आता बदलत्या युगात टिकण्यासाठी, आपल्या उत्पादित दागिन्यांची बाजारपेठ कायम राखण्यासाठी तसेच नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. सध्या या ठिकाणी आग्रा (उत्तर प्रदेश ) व सेलम (तमिळनाडू)च्या धर्तीवर अतिशय सुबक कलाकुसर असणाऱ्या दागिन्यांची निर्मिती होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत रौप्यनगरी हुपरी ही चांदी दागिन्याची मोठी बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर आहे. येथील चांदी व्यावसायिकांनी अत्यंत कलाकुसरीच्या दागिन्यांची निर्मिती सुरूकेल्याने उद्योगाला उभारी मिळणार आहे.
हुपरीच्या चांदी उद्योगाला सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. येथील सोनार कुटुंबीय शतकांपूर्वी वार्षिक शेतसारा वसूल करण्याच्या कामाबरोबरच नाण्यांच्या खऱ्या-खोट्या तपासणीचेही काम करीत असत. त्यामध्ये केशव व कृष्णा सोनार हे दोघे कसबी कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. दादू केशव पोतदार व वामन कृष्णाजी पोतदार या त्यांच्या मुलांना हुपरीच्या चांदी व्यवसायाचे आद्यप्रवर्तक मानले जाते. या व्यवसायातील सर्व व्यवहार दागिने घडविण्याच्या मजुरीवर व चांदीच्या बदल्यात चांदी या हिशोबाने होतात. चांदीचा एक दागिना तयार होण्यासाठी जवळजवळ तीस टप्प्यामध्ये प्रक्रिया करावी लागते. एवढ्या सर्व प्रक्रियांतून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला बारीक सारीक कलाकुसरीने सजलेले आकर्षक दागिने पहावयास मिळतात. पूर्वी या ठिकाणी तोडेवाळे, स्प्रिंग वाळे, हातातील कडे, गळ्यातील पेट्या, साखळी बदाम, टपली, करदोडे, गुजरव करदोडे, घुंगरू, कमरपट्टे, बंधन, तोरडी, बॉल तोरडी, गुणमाला, बंधनाच्या सर्व डिझाइन्स, पैंजनाचे सर्व प्रकार तयार होत होते. बाजारात सध्या नाजूक व सूक्ष्म कलाकृती असणाऱ्या दागिन्यांना मागणी आहे. दागिने कमी वजनाचे असावेत असाही सूर आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक, कारागिरांनीही आता नव्या पिढीसाठी नव्या कल्पना आत्मसात करून तशा प्रकारचे दागिने तयार करण्यास सुरवात केली आहे. सध्या या व्यवसायात काही प्रमाणात आधुनिक यांत्रिकी पद्धतीच्या प्रक्रिया घडू लागल्या आहेत. विशेषत: साखळी तयार करणे, पास्टा तापविणे, दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी ‘व्हायब्रेटर’ मशीनचा वापर होत आहे. या बदलत्या प्रक्रियेमुळे दागिन्यांना बाजारपेठेतून मागणी वाढू लागली आहे. येथील चांदी उद्योगाला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा विश्वास उद्योजकांमधून व्यक्त करण्यात येत आहे .
१ तमिळनाडूतील सेलम व उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पायलने संपूर्ण बाजारपेठेत आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे हुपरी येथील अनेक उद्योजकांनी त्याच धर्तीवर दागिने बनविण्यास सुरुवात केली आहे. आता येथेही सुबक व आकर्षक अशी पायलची निर्मिती सुरू झाली असून, देशभराच्या बाजारपेठेत ती पोहोचलीही आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीच्या काळातही हुपरीच्या दागिन्यांनी आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे.
२ नाजूक, मजबूत व टिकाऊ अशी हुपरीच्या दागिन्यांची ओळख आजही देशातील विविध बाजारपेठांत कायम असल्याने देशातील बाजारपेठांत हुपरीच्या विविध दागिन्यांना मागणी वाढतच आहे. येथील कारागीर, धडी उत्पादक त्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत.
३ सेलम व आग्रा पायल च्या धर्तीवर दागिने निर्माण करीत असताना बड्या व्यावसायिकांनी आता हुपरी व परिसरातील सर्वच कारागिरांनाही यात सहभागी करून घेवून हे तंत्रज्ञान त्यांनाही आत्मसात करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. जेणेकरून परिसरातील सर्वच कारागिरांना काम मिळेल व जादा कामाची निर्मिती होऊन उद्योगवाढीस त्याचा चांगला फायदा होईल.
४चांदी व्यवसायातील बदलांचा बारकाईने अभ्यास करून शहरात विविध मोठ्या बँका, कापोर्रेट कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. काही मोठ्या बँकांनी येथे शाखाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात हुपरी शहर चांदी उद्योगातील एक मोठी बाजारपेठ होईल असे चित्र आहे .चांदी दागिने निर्मिती करून ते देशातील प्रत्येक बाजारपेठेत जाऊन देण्याची पारंपरिक पद्धत आजही सुरू आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हुपरी येथे येऊन दागिने घेवून जाण्याचा पायंडा पडत चालला आहे. त्यामुळे हुपरीला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होत आहे .
५कमी भांडवलदार व्यावसायिकांना हे पेलणारे नसले तरी उद्योगातील हा बदल शहराला व चांदी उद्योगाला एका महत्त्वाच्या टप्प्यावर नेणारा ठरणार आहे. त्यादृष्टीने अनेक होतकरू व्यावसायिक प्रयत्नशील असून त्यांनी तशा पद्धतीने कामही सुरू केले आहे. प्रत्येक दागिन्यांची आकर्षक अशा पद्धतीची पॅकिंगची व्यवस्था करून आपल्या ब्रँडने दागिने तयार केले जात असून, यातून चांदी उद्योगाला नवीन उभारी मिळण्यास फार मोठी मदत होत आहे.
६सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा असणाऱ्या येथील चांदी उद्योगाकडे आतापर्यंत केंद्र व राज्य शासनाने पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. प्रतिवर्षी सुमारे एक हजार ते बाराशे टन विविध प्रकारच्या चांदीच्या दागिन्यांची निर्मिती या ठिकाणी होत असते. संपूर्ण भारतात असे एकही गाव, शहर नसेल जेथे हुपरीचा दागिना पोहोचला नसेल. अशी वस्तुस्थिती असतानाही व इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या या उद्योगाला शासनाने कोणत्याही प्रकारचे संरक्षण, पाठबळ किंवा मदत आतापर्यंत केलेली नाही. या उद्योगाची जी काय प्रगती किंवा वृद्धी झाली ती केवळ स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांच्या योगदानातूनच.
७चांदी व्यवसायाचे उद्ध्वर्यू व विकासात्मक दृष्टी असणारे जाणते समाजसेवक हुपरीभूषण स्वर्गीय य. रा. तथा बापूसाहेब नाईक यांच्या कुशल मार्गदर्शन व प्रशासकीय दृष्टीमुळे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या व्यवसायाचे आता वटवृक्षात रुपांतर होवून हा व्यवसाय हजारो कुटुंबाचा तारणहार झाला आहे.