मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए...; शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:53 AM2018-10-23T10:53:04+5:302018-10-23T10:54:52+5:30
: ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.
कोल्हापूर : ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ‘एआययू’चे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल प्रमुख उपस्थित होते.
या ‘जश्न-ए-कव्वाली’ची सुरुवात सागर (मध्य प्रदेश) मधील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाच्या संघाने केली. या संघाने ‘मेहफिल हमारी एक है, मेहफिल के टुकडे मत करो... मंजिल हमारी एक है, मंजिल के टुकडे मत करो... भारत हमारा एक है, भारत के टुकडे मत करो...’ या कव्वालीतून एकात्मतेची साद घातली.
राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाए’ ही कव्वाली सादर केली. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’ आणि ‘मन कुंथो मौला...’ ही कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुंबई विद्यापीठाच्यासंघाने सादर केलेल्या ‘ये वतन तेरे खातीर...’ ‘आज रंग है री...’ या कव्वालीने स्पर्धेत रंग भरला. पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सादरीकरणाने स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. उर्दूतील नजाकतीच्या शेरोशायरी, सूर-तालाच्या संगमातून सादर झालेल्या कव्वालीने विद्यापीठात एक वेगळे वातावरण निर्माण केले. रसिकांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.
देशभक्तिपर आणि पारंपरिक या प्रकारांमध्ये कव्वालीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दरम्यान, उद्घाटनाच्या कार्यक्रमात परीक्षक सईद खान, रियाझ खान, भारती वैशंपायन यांचे डॉ. स्वरूपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी आभार मानले.
समारोप आज
या स्पर्धेत देशभरातील आठ संघ सहभागी झाले आहेत. त्यातील पाच संघांनी पहिल्या दिवशी सादरीकरण केले. आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेड, संत गागडेबाबा विद्यापीठ अमरावती आणि महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतकचे संघ सादरीकरण करणार आहेत. दुपारी चार वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.