आकुर्डेत सर्वच पक्ष ताकद पणाला लावणार

By admin | Published: January 9, 2017 11:37 PM2017-01-09T23:37:27+5:302017-01-09T23:37:27+5:30

भुदरगडमधील सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला एकमेवमतदारसंघ : दोन्ही काँग्रेसची पकड घट्ट; शिवसेनेसह भाजपकडूनही जोरदार मोर्चेबांधणी

All parties in the Akurdut will be strengthened | आकुर्डेत सर्वच पक्ष ताकद पणाला लावणार

आकुर्डेत सर्वच पक्ष ताकद पणाला लावणार

Next

शिवाजी सावंत --गारगोटी --भुदरगड तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी केवळ आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघच सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने अनेक इच्छुक उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला होता; परंतु यावेळी मात्र विजयाचा दावा कोणीही करू शकत नाही. या मतदारसंघावर दोन्ही काँग्रेसची पकड घट्ट असली तरी यावेळेस शिवसेनेसह आमदार प्रकाश आबिटकर गट, भाजप व महाडिकप्रणित ताराराणी आघाडी, आणि अपक्ष उमेदवार प्रमुख दावेदार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. दोलायमान स्थितीत असणारा हा मतदारसंघ लक्षणीय लढतीचा ठरणार आहे.
या मतदारसंघात गतवेळी काँग्रेस च्या रूपाली पाटील विजयी झाल्या होत्या. त्यावेळी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार बजरंग देसाई यांच्यात युती झाली होती. तर राष्ट्रवादी एकाकी लढली होती. पंचायत समिती मिणच्या गणातून राष्ट्रवादीचे शिवाजी देसाई यांनी, तर कूर गणातून दिनकरराव जाधव गटातील रतिपोर्णिमा कामत निवडून आलेल्या होत्या.
सध्या हा मतदारसंघ खुला झाल्याने काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रदीप पाटील, म्हसवे येथील संजय देसाई, रवींद्र कामत, संदीप पाटील, तर राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ‘बिद्री’चे संचालक जीवन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवराज बारदेस्कर, आमदार आबिटकर गटातून मधुकर देसाई व कल्याण निकम, भाजपचे नाथाजी पाटील, हे तर उद्योगपती सयाजी देसाई हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस पक्षातील दुफळी यंदा प्रथमच विभागून त्रिफळी झाली आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या गटाने आमदार आबिटकर यांच्या गटाशी संधान बांधले आहे. माजी आमदार बजरंग देसाई हे एकाकी झुंज देत आहेत. यावेळी शामरावदादा देसाई व युवा नेते सचिन घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या फळीतील प्रवेशाने पक्षात त्रिफळी निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची सत्ता या मतदारसंघावर आहे.
यंदा प्रथमच आमदार प्रकाश आबिटकर शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येणार आहेत. मधुकर देसाई, कल्याण निकम या इच्छुकांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाकडे या मतदारसंघाचे असलेले नेतृत्व आणि राष्ट्रवादी पक्षाची ताकद हे दोन्ही थोपविताना आमदार गटाला चांगलीच व्युहरचना करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत असलेल्या माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांची ताकद या पक्षाच्या पाठीशी असल्याने ते भक्कमपणे असल्याने लढती या तोडीसतोड होण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष देवराज बारदेस्कर, ‘बिद्री’चे माजी संचालक जीवन पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. देवराज बारदेस्कर यांचे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले कार्य हे खूप मोठे आहे. शिवाय या मतदारसंघात महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. जीवन पाटील यांच्या दोन पिढ्या राजकारणाशी संबंधित आहेत. वडील पी. डी. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. याशिवाय जीवन पाटील यांचे साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करताना शेतकरीवर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे. हे सर्व पाहता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी देताना खूप विचार करायला लावणारा आहे.
काँग्रेसने या मतदारसंघात दहा वर्षे सत्ता ताब्यात ठेवली आहे. विद्यमान सदस्या रूपाली पाटील यांचे पती प्रदीप पाटील यांनी काम करताना लोकसंपर्क, कामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिला आहे. हे सगळे करताना गटा-तटाचा विचार केला नाही. त्यामुळे सध्या त्यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय म्हसवे येथील संजय देसाई, दिनकर देसाई, एन. डी. पाटील , संदीप पाटील हे इच्छुक आहेत. संजय देसाई हे अतिशय शांत स्वभावाचे आणि मनमिळावू आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कोठेही संधी मिळाली नसल्याने ते आग्रही मागणी करीत आहेत.
भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, संतोष पाटील, प्रा. हिंदुराव पाटील, अलकेश कांदळकर हे इच्छुक उमेदवार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली महत्त्वाची विकासकामे पाहता यंदा प्रथमच भाजपचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अपक्ष म्हणून गारगोटीचे माजी उपसरपंच व उद्योगपती सयाजी देसाई निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सयाजी देसाई यांचे डिजिटल सर्व मतदारसंघात उभारले आहेत. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
या सर्व घडामोडीत नाराजीचा सवतासुभा होण्याची दाट शक्यता आहे. महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे काही उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आघाडीकडून जोरदारपणे होण्याची शक्यता आहे. काही इच्छुक उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत, असे बोलले जात आहे. ही निवडणूक चुरशीची होणार आहे. याशिवाय प्रथमच शिवसेना, भाजप, ताराराणी या तीन पक्षांचे उमेदवार उभे राहणार आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र लढविणार असल्याचे जाहीर केले असले तरीही सोयीनुसार आघाड्या तयार होतील.
शेणगाव पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. येथून काँग्रेसकडून प्रवीण नलवडे, सुरेश गुरव, दिनकर गुरव, डॉ. अशोक पारकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधून नामदेव कुंभार, अनिल कोरे, भास्कर तेलंग, शिवसेनेतून सुरेश नाईक, थॉमस डिसोझा, प्रकाश खोत, भाजपमधून सुनील तेली, इच्छुक आहेत.
कूर गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे. येथे काँग्रेसकडून सागर पाटील, एन. डी. पाटील, एकनाथ आगम, तर राष्ट्रवादीतून अरुण भोसले, एस. के. पाटील, संभाजी पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, शिवसेनेतून विक्रम पाटील, अजित देसाई, शामरावनाना पाटील, भाजपमधून संतोष पाटील, प्रा. हिंदुराव पाटील, हे इच्छुक उमेदवार आहेत.


मतदारसंघातील गावे : आकुर्डे, कूर, कोनवडे, बसरेवाडी, दारवाड, नाधवडे, निळपण, पाचवडे, टिक्केवाडी, म्हसवे, देवकेवाडी, शेणगाव, महालवाडी, भाटिवडे, फये, हेदवडे, गिरगाव, कोळवण, पाळेवाडी, मिणचे खूर्द, नवरसवाडी, मिणचे बुद्रूक, पंडिवरे ही २३ गावे येतात.

Web Title: All parties in the Akurdut will be strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.