मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:09+5:302021-06-02T04:19:09+5:30
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी ...
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप वगळून सर्वपक्षीय एकत्र लढा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी येथे बैठकीत झाला. येथील अक्कमहादेवी मंटपात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकाराने बैठक झाली. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी देवणे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कारभारामुळे शेतकरी, कामगार अडचणीत आले आहेत. वेळीच उपाययोजना न केल्याने देशात कोरोनाचा उद्रेक झाला. म्हणून मोदींविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोल्हापुरातून लढ्याला सुरुवात करूया. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ५ जून रोजी निदर्शने करूया.
राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे.
ॲड. गुलाबराव घोरपडे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने भाजप सरकार नसलेल्या राज्यांना त्रास देत आहे. भाजपच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेवर खासदारकीचे बक्षीस दिले जात आहे. अशा न्याय व्यवस्थेकडून मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक निकालाची कशी अपेक्षा ठेवायची ?
दिलीप पवार, संदीप देसाई यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
आणखी एक समिती
कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापण्याची घोषणा देवणे यांनी केली. समितीचे निमंत्रक राष्ट्रवादीचे पक्षाचे शहर अध्यक्ष पोवार आणि सचिव म्हणून सतीशचंद्र कांबळे काम करतील, असेही त्यांनी जाहीर केले. शहर आणि जिल्ह्यात आता विविध समित्या कार्यरत असताना त्यात पुन्हा या नवीन समितीची भर पडणार आहे.
फोटो : 01062021-कोल-बैठक
कोल्हापुरातील अक्कमहादेवी मंटपातील सर्वपक्षीय बैठकीत विजय देवणे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नामदेव गावडे, ॲड. गुलाबराव घोरपडे, चंद्रकांत यादव, ए. वाय. पाटील, बाबूराव कदम, आर. के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई उपस्थित होते.