भोजेंवरील विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे सर्वपक्षीय सदस्य संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:47+5:302021-02-10T04:24:47+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्याविरोधात महिला अधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने मंगळवारी सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्याविरोधात महिला अधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने मंगळवारी सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दिवसभरामध्ये ३४ पदाधिकारी, सदस्यांनी एकत्र येत २२ फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली. या सभेत प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा करण्याचा निर्धार सदस्यांनी केला आहे.
सर्व प्रमुख अधिकारी स्मार्ट ग्राम तपासणीसाठी जिल्ह्यात गेल्याने दिवसभर पदाधिकारी, प्रमुख सदस्यांनी चर्चा केली. मध्यंतरीच्या काळात पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. संध्याकाळी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनातील बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपस्थित होत्या. अध्यक्ष पाटील यांनी या विषयावर विशेष सभेची सदस्यांनी मागणी केल्याचे सांगितले.
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले म्हणाले, ‘मॅट’ घोटाळ्याचा अहवाल अजून मिळालेला नाही. आम्हांला प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर चर्चा करायची आहे. यासाठी विशेष सभा बोलवावी. गुन्हा दाखल करताना तुमची परवानगी घेतली होती का? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; परंतु काळ सोकावता कामा नये.
शशिकांत खोत म्हणाले, आता सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. म्हणजे कोण एक नंबरचे करतो आणि कोण दोन नंबरचे हेदेखील कळेल. सदस्य राजवर्धन निंबाळकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित महिला अधिकाऱ्याला रजा देऊ नका. माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनीही विशेष सभेसाठी स्वतंत्र पत्र दिले.
यावेळी सभापती प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, भगवान पाटील, अशोकराव माने, प्रसाद खोबरे, विशांत महापुरे, शंकर पाटील, विजय बोरगे, विनय पाटील, सुभाष सातपुते, मनोज फराकटे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सकाळच्या सत्रात उपाध्यक्ष सतीश पाटील, जयवंत शिंपी, अंबरीश घाटगे, सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनीही चर्चेत भाग घेतला.
चौकट
ऑडिओ, व्हिडीओच्या पुराव्याचा दावा
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, त्यांचा थेट पोलीस ठाण्यातूनच फोन आला होता. माझ्याकडे याबाबतच्या ऑडिओ, व्हिडीओ आहेत. त्यामुळे मी फिर्याद देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी माझ्याकडे लेखी परवानगी मागितली नाही. त्यांच्याकडे वैयक्तिक पुरावे आहेत की नाही माहीत नाही. मात्र वैयक्तिक पातळीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
चौकट
नोकरी गेली तरी हरकत नाही
संबंधित महिला अधिकाऱ्याशी काहीजणांनी दुपारी चर्चा केली. त्यावेळी ‘तुम्ही हे प्रकरण वाढवू नका,’ असा सल्ला त्यांना देण्यात आला. मात्र या प्रकरणात मला मोठा त्रास झाला आहे. माझी नोकरी गेली तरी हरकत नाही. हा विचार करूनच मी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौकट
संबंधित अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता
या महिला अधिकाऱ्याने फिर्याद देताना ‘माझ्या मुलीसोबत दिवाळीनिमित्त भोजे यांच्या घरी पैसे देण्यासाठी गेले होते,’ असा लेखी जबाब दिला आहे. अधिकाऱ्याने पैसे देणे हादेखील गुन्हा असल्याने आणि फिर्यादीत मॅट प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे संबंधित अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
चौकट
नवीन मॅटही फेटाळली
आधीची निकृष्ट मॅट बदलून ठेकेदाराने नवी मॅट दिली आहे. मात्र ही मॅटदेखील स्पेसिफिकेशनप्रमाणे नसल्याने नाकारण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच तुमच्याविरोधातच गुन्हा दाखल करीन, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित महिला अधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
०९०२२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी मंगळवारी सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे केली. (छाया : नसीर अत्तार)