छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा साकारण्यास सर्वतोपरी मदत : खासदार संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:02 AM2021-03-06T10:02:52+5:302021-03-06T10:08:46+5:30
Rajaram College Sambhaji Raje Chhatrapati kolhapur -राजाराम महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
राजाराम महाविद्यालयाला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. प्राचार्य अण्णासाहेब खेमनर यांनी महाविद्यालय परिसरात छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा उभारणीबाबतची माहिती दिली. त्याबाबतचा नियोजित आराखडाही सादर केला. पुतळा उभारणीसाठी समितीची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना माजी विद्यार्थी (राजारामीयन) शशांक पाटील, श्रीकांत सावंत यांनी केली.
लोकसहभागामधून पुतळा उभारण्यात यावा, असे दीपक जमेनिस, हेमंत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर पुतळा उभारणीबाबत सर्वांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रवीण खडके, संजय सावंत, संजय पाठारे, डॉ. प्रवीण कोडोलीकर आदी उपस्थित होते.
फ्लॉरेन्समध्ये समाधी, पुतळा
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांनी प्रजाहितदक्ष राजा म्हणून राज्यकारभार केला. कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी शिक्षणाच्या सुविधा दिल्या. इटली दौऱ्यावर असताना फ्लॉरेन्समध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी, पुतळा त्या ठिकाणी आहे. त्यांनी स्थापन केलेल्या राजाराम महाविद्यालयात आता त्यांचा पुतळा उभारण्याचा विचार माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने केला आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी देखील खासदार संभाजीराजे यांना पुतळा उभारणीबाबत विनंती केली आहे. मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.