शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड ३१ मेपर्यंत आॅनलाईन-: प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:07 AM2019-05-21T01:07:17+5:302019-05-21T01:08:38+5:30
शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संतोष पाटील ।
कोल्हापूर : शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील चार हजार ७/१२ पत्रके प्रॉपर्टी कार्डात रूपांतरित झाली आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या साईनसह आॅनलाईन उपलब्ध होणारी ही मिळकतपत्रके कायदेशीररीत्या ग्राह्य असणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून ७/१२ आॅनलाईन करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.
आॅनलाईनमुळे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचतात. मिळकतीवरील फेरफार घरबसल्या पाहणे शक्य होते. या धर्तीवर शहर हद्दीतील सर्व मिळकतपत्रके आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ३० खासगी आॅपरेटर नेमण्यात आले आहेत. याची तपासणी भूमापन अधिकाऱ्यांकडून केली जाते. रोज सरासरी दोन हजार मिळकती आॅनलाईन जोडल्या जात आहेत.
शहराच्या हद्दीत सुमारे २० हजार मिळकती शेतजमिनीवर आहेत. त्यातील ११ हजार ६५८ मिळकतींच्या ७/१२ वर नोंदी शेतीतून बिगरशेतीत झाल्या आहेत. यातील चार हजार बिगरशेती ७/१२ चे प्रॉपर्टी कार्ड बनले. ज्या मिळकतींवर बिगरशेती नोंदी स्पष्टपणे झाल्या आहेत, त्या मिळकती महसूल व भूमापन कार्यालयातर्फे प्रॉपर्टी कार्डात रूपांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्रुटी राहिलेले म्हणजे लेआऊट, बिगरशेती आदेश, आदी कारणांनी प्रलंबित आहेत, त्यांनी पुरावे सादर केल्यास हे ७/१२ मिळकतपत्रात रूपांतरित करण्याची सोय केल्याची माहिती भूमापन अधिकारी किरण माने यांनी दिली.
मिळकत नोंदीचा फायदा
शासनाच्या विविध योजनांचा लाभ, गृहकर्ज किंवा तत्सम कर्जप्रकरणे, मिळकतींचे हस्तांतरण, न्यायालयीन कामकाज, सहज पद्धतीनं मिळकतीच्या फेरबदलातील नोंदींवर लक्ष ठेवणे, आदींसाठी मिळकतीची नोंद (प्रॉपर्टी कार्ड) असणे आवश्यक आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत खरेदी-विक्रीनंतरचा दस्त महत्त्वाचा घटक असल्याने मिळकतपत्रावर नोंदीकडे दुर्लक्ष केले जाते. दस्तनोंद महत्त्वाची आहेच, त्या जोडला मिळकत पत्रकामुळे मिळकतीची दुहेरी नोंद होत असल्याने फसवणूक टळते.
बिगरशेती ७/१२ चे मिळकत पत्रक करणे तसेच प्रॉपर्टी कार्ड आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. शहरातील ४६ हजार मिळकतींवर सहा लाख नोंदी आहेत. यात त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात आहे.
- किरण माने, नगर भूमापन अधिकारी