हाळवणकरांना सभापती निवडीचे सर्वाधिकार
By admin | Published: January 6, 2017 12:17 AM2017-01-06T00:17:21+5:302017-01-06T00:17:21+5:30
‘भाजप’चा निर्णय : समित्यांची आज निवड
इचलकरंजी : येथील नगरपालिकेतील विविध विषय समित्यांची निवडणूक आज, शुक्रवारी होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपची बैठक गुरुवारी झाली. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन समित्यांच्या सभापती निवडीचे अधिकार आमदार सुरेश हाळवणकर यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथील नगरपालिकेमध्ये भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी अशी युती सत्तेत आहे. नगरपालिकेतील विविध विषय समित्यांमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा समिती राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे जाणार असून, ताराराणी आघाडीकडे उपनगराध्यक्षपद आहे. भाजपच्या अॅड. अलका स्वामी नगराध्यक्ष आहेत, तर महिला व बालकल्याण, आरोग्य व स्वच्छता आणि शिक्षण या तीन समित्या भाजपकडे आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांची बैठक पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी आयोजित केली होती. यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक अजित जाधव उपस्थित होते.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी शहर कॉँग्रेस समितीत कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेस नगरसेवकांची व शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी आयोजित केलेल्या आघाडीच्या नगरसेवकांची बैठक मदन कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकींत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या कोटानिहाय नगरसेवकांच्या संख्येनुसार पाच समित्यांवर सदस्यांची नावे देण्याचे ठरविले. (प्रतिनिधी)
अपक्ष दोन नगरसेवकांच्या समावेशाविषयी उत्सुकता
पालिकेतील एकूण ६२पैकी ६० नगरसेवकांना विविध विषय समित्यांवर सदस्यत्व मिळते. मात्र, मदन झोरे व सुनीता बेडक्याळे हे दोन नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना समितीमध्ये वर्णी लागण्यासाठी सभाध्यक्ष प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यांच्या मागणीची दखल प्रांताधिकारी यांच्याकडून घेतली जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.