Kolhapur: सहकारी तत्त्वावर जोतिबासह २३ गावांचाही चौफेर विकास, प्राधिकरणची संकल्पना
By समीर देशपांडे | Published: July 10, 2024 02:06 PM2024-07-10T14:06:14+5:302024-07-10T14:07:52+5:30
आराखडा वास्तवात आणणे आव्हानात्मक
समीर देशपांडे
कोल्हापूर: भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जोतिबा देवस्थानच्या महात्म्याच्या माध्यमातून जोतिबा डोंगर आणि परिसरातील २३ गावांच्या विकासाचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सहकारी तत्त्वावर जोतिबा प्राधिकरणाचा पूर्ण विकास अशीही यामध्ये संकल्पना असून, याव्दारे परिसरातील २३ गावांचा चौफेर विकास होईल, असे मनमोहक चित्र या आराखड्यातून तयार करण्यात आले आहे. व्यावसायिकदृष्ट्या जोतिबा ब्रॅण्डची निर्मिती हादेखील यातील एक घटक आहे.
जोतिबा डोंगरावर वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे तेथील पायाभूत सोयी सुविधांवर सध्या ताण येत आहे. आपत्कालीन व्यवस्थेवरही हा ताण येत असून, यामुळे नागरिक, भाविकांना दर्जेदार सोयी, सुविधा देण्यावर मर्यादा येत आहेत. केवळ जोतिबा मंदिराचा विकास असा दृष्टिकोन न ठेवता डोंगरासह परिसरातील गावांना यामध्ये समाविष्ट केल्यास संपूर्ण पंचक्रोशी एकाच दिशेने विकास करेल, अशी यामागील संकल्पना आहे. म्हणून चार टप्प्यांमध्ये हा आराखडा मांडण्यात आला आहे. यामध्ये जोतिबा मंदिर परिसराच्या विकासकासह जुनी प्राचीन मंदिरे आणि घरांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे.
हा आराखडा अंमलात आणल्यास डोंगर संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व सांडपाण्याचे योग्य नियोजन, वाढत्या भूस्खलनावर नियंत्रण, जुने, प्राचीन जलस्रोत पुन्हा कार्यान्वित करणे, घनकचरा व प्रदूषणविरहीत व्यवस्था उभारणे, जोतिबा डोंगराची असलेली नाळ आणखी मजबूत करणे, पायाभूत सुविधांचा विकास, कृषी व पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास यासाठी मोठे काम होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्राधिकरण आवश्यक असून, सर्व शासकीय विभागांच्या मदतीने अंमलबजावणी करणे, यातून भाविकांना चांगल्या सुविधा देणे, यासाठीची सर्व प्रक्रिया शासनाच्या मदतीने हे प्राधिकरण करेल, असे नियोजन आहे.
पहिल्या टप्प्यातील गावे
गिरोली, पोहाळे, दाणेवाडी, कुशिरे, केखले, जाखले, सादळे, मादळे, माले, केर्ली
दुसऱ्या टप्प्यातील गावे
पन्हाळा, बुधवार पेठ, बहिरेवाडी, बोरपाडळे, पोखले, जाफळे
तिसऱ्या टप्प्यातील गावे
कासारवाडी, शिये, वडणगे, निगवे दुमाला, भुये, मोहरे
विकासाचे मनोहारी चित्र
- पोहाळे/ गुहा आणि परिसराचे सौंदर्यीकरण, अभयारण्य
- कुशिरे/ लघु औद्योगिक वसाहत
- केखले/दवणा प्रक्रिया उद्योग
- माले/ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भेट माले गावी झाली होती. ते स्मृतीस्थळ उभारणे
- केर्ली/दगडी कोरीव कामाला पाठबळ देणारी शिल्पशाळा, हुनरशाळा
उत्पन्नाचेही नियोजन
वर्षभरामध्ये येणाऱ्या भाविकांपैकी पायी आणि शासकीय बसमधून येणारे भाविक वगळता दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने, खासगी वाहनांनी येणाऱ्यांसाठी प्रवेश कर, वाहनतळ कर, भक्तनिवास भाडे, दुकानगाळे भाडे, खोबऱ्यापासून बनवला जाईल असा जोतिबा प्रसाद यातून वर्षाला १२ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गणित मांडण्यात आले आहे. जोतिबा माहिती दर्शक केंद्र, म्युझिकल फाउंडन शो, प्राणी संग्रहालय यातून साडे चार कोटी वर्षाला मिळतील, असेही कागदावर गणित मांडण्यात आले आहे.
हा केवळ आराखडा
जोतिबा मंदिर आणि परिसरातील २३ गावांचा कशा पध्दतीने विकास करता येईल, याचा हा फक्त आराखडा आहे. हा कागदावर अतिशय उत्तम दिसत आहे. परंतु,हा वास्तवात आणणे आव्हानात्मक आहे. कारण या पध्दतीने विकास करताना सध्याच्या रचनेत, परिस्थितीत, यंत्रणेत मोठा बदल करावा लागणार आहे. तो ग्रामस्थ, भाविक या सर्वांना पचनी पडल्यानंतर मग अशा पध्दतीने प्राधिकरण कार्यरत होणार आहे.