शेतकरी, ठेवीदारांच्या हितासाठी सर्वपक्षीय मोट
By admin | Published: April 28, 2015 12:41 AM2015-04-28T00:41:02+5:302015-04-28T00:46:39+5:30
पी. एन. पाटील : काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांची बैठक ; गालबोट न लागणारा कारभार करु
कोल्हापूर : शेतकरी व ठेवीदारांच्या हितासाठी राजकीय विनिमयश बाजूला ठेवून जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय मोट बांधली आहे. बँकेच्या हितास गालबोट लागेल असा कारभार होणार नाही याची दक्षता सर्वच पक्षांचे नेते घेतील, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पी. एन. पाटील म्हणाले,नांदेड, बीड जिल्हा बँकांची अवस्था वाईट होती, त्यांना शासनाने मदत दिली, आमच्या बँकेची परिस्थिती चांगली आहे, पाचशे कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत, केवळ अनियमितेमुळे प्रशासक आले. पूर्वी वसूल न होणाऱ्या कर्जासाठी बुडीत फंड होता, आता नसल्याने थेट एनपीए तरतूद करावी लागते. आम्ही एक अजेंठा घेऊन सभासदांसमोर जात आहे, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार आहे, शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करते पण या योजनेत काही त्रुटी आहेत, त्या दूर करून या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल यासाठीही प्रयत्नशील आहे. बँक चांगली चालविण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सहकारी संस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. ते निश्चितच कारभार चांगला करून बँकेला गतवैभव मिळवून देतील. केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेतील ११२ कोटी रुपये परत गेले आहेत, हे पैसे ‘नाबार्ड’कडे पडून आहेत, याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. बँकेचे नवीन संचालक मंडळ आले की त्यांना सोबत घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेतील कर्जवाटपात अनियमिता राहिल्याने एनपीए वाढत गेला आणि प्रशासक आले. येथे कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. बँकिंग धोरण बदलत आहे, त्यानुसार आम्हाला भविष्यात काम करावे लागणार आहे. अपात्र कर्जमाफीतील कोट्यवधी रुपये ‘नाबार्ड’कडे पडून आहेत, तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही खासदारांनी प्रयत्न करावेत. यावेळी के. पी. पाटील, निवेदिता माने, उदयानी साळुंखे, अरुण नरके, अप्पी पाटील, प्रा. जयंत पाटील, राहुल आवाडे, राजू आवळे, आर. के. पोवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नरकेंमुळेच चार जागा बिनविरोध
पन्हाळ्यातून माघार घेत विनय कोरे यांना बिनविरोध केले, त्यामुळे कोरे यांनी हातकणंगलेतून महादेवराव महाडिक यांना बिनविरोध केले. करवीरमधून पी. एन. पाटील यांच्या विरोधातील अर्ज आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतल्याने राधानगरीतून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेऊन ए. वाय. पाटील यांना बिनविरोध केले. या चार जागा बिनविरोध करण्यामागे नरके काका-पुतण्यांचे योगदान असल्याचे अरुण नरके यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर निर्णय
दोन्ही काँग्रेसच्या पॅनेलमध्ये जाताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. कदाचित कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठांशी चर्चा केली नसेल, असा टोला संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या नेत्यांना हाणला.
‘बंटीं’च्या मुळेच मंडलिकांना उमेदवारी