सर्वच क्षेत्रातील घडी विस्कटणार; हजारोंच्या उपस्थितीत वसगडेची यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:10 AM2018-10-29T00:10:16+5:302018-10-29T00:10:21+5:30
गांधीनगर : राज्यात कोणताही ताळमेळ बसणार नाही, सर्वच क्षेत्रात घडी विस्कटणार आहे. रसभांडे आहे, तसे राहणार आहे. रोहिणीचा पाऊस ...
गांधीनगर : राज्यात कोणताही ताळमेळ बसणार नाही, सर्वच क्षेत्रात घडी विस्कटणार आहे. रसभांडे आहे, तसे राहणार आहे. रोहिणीचा पाऊस होईल, देवधर्मासाठी सर्व गाव एकत्र येईल, अशी भाकणूक फरांडेबाबा आबादेव वायकुळे यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगितली. वसगडे (ता. करवीर) येथे भाकणूक व हेडाम खेळावेळी भंडाऱ्याची अमाप उधळण करण्यात आली. ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात धनगरी ढोलांच्या निनादाने आसमंत दणाणून गेला.
गावकामगार पोलीसपाटील संजय पाटील यांच्या घरापासून वाजत गाजत शिरसाव (जिल्हा उस्मानाबाद) येथील आबादेव वायकुळे (फरांडेबाबा) यांना मंदिरासमोरील दगडी गादीवर बसविण्यात आले होते. तत्पूर्वी तिपगौडा पाटील हे कांबळ घेऊन आले. सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच संदीप कामत, यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मानकºयांनी फरांडेबाबांना घेऊन मंदिरासमोर आले. संजय पाटील यांनी कांबळाचे पूजन करून तलवार फरांडेबाबांकडे सुपूर्द केली. तेथून भंडारा उधळणीत हेडाम खेळत बाबा मंदिरात आले. तेथे हजारो भाविकांना त्यांनी भाकणूक सांगितली.
भाकणुकीनंतर फरांडेबाबांनी पोलीसपाटील संजय पाटील यांच्या घरी अंघोळ करून उपवास सोडला. सायंकाळी पालखी मिरवणूक पार पडली. यावेळी उसाने भरलेल्या ११ बैलगाडीतील ऊस लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. फरांडेबाबांसोबत सुमारे पाचशे भाविक जेवणाला जातात. कोणताही जात-धर्म न पाळता सकाळी साडेसहा वाजल्यापासून जेवणाला सुरुवात होते. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई केल्यामुळे मंदिर परिसर उजळून गेला आहे. घोंगडी, खाद्यपदार्थ, पाळणे, नारळ, कापूर, साखर, खेळण्यांची दुकाने भाविकांनी फुलून गेली होती. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.