आजपासून शहरातील सरसकट दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:29+5:302021-07-05T04:15:29+5:30

कोल्हापूर : शहरातील सरसकट दुकाने आज, सोमवारपासून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू होणार आहेत. व्यावसायिक, दुकानदारांनी ...

All the shops in the city will be opened from today | आजपासून शहरातील सरसकट दुकाने उघडणार

आजपासून शहरातील सरसकट दुकाने उघडणार

Next

कोल्हापूर : शहरातील सरसकट दुकाने आज, सोमवारपासून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू होणार आहेत. व्यावसायिक, दुकानदारांनी एकाचवेळी सकाळी ९ वाजता सर्व दुकाने उघडण्याची तयारी केली आहे. यासाठी सर्वच व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्सनेही पुढाकार घेतला आहे. त्यांना पाठबळही दिले आहे.

जीवनावश्यक वस्तू, सेवा देणारी दुकाने वगळता इतर दुकाने तीन महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे संबंधित दुकानदार, व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. दीर्घ काळ दुकाने बंद असल्याने कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. दुकाने बंद असतानाही भाडे इतर कर, कर्जाचे हप्ते सुरू राहिल्याने आर्थिक कोंडी झालेले अनेकजण व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकी भीषण स्थिती निर्माण झाल्याने विविध व्यापारी संघटना सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या कमी झाले नसल्याने सर्व दुकाने सुरू करण्यास सरकार परवानगी देण्यास नकार देत आहे. यातून मार्ग काढत जिल्हा प्रशासनाने शहरात दोन आठवड्यांत कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे दोन दिवसांपूर्वी पाठवला आहे. यावर सरकारने विचार न केल्याने व्यापारी, दुकानदार आक्रमक बनले आहेत. त्यांनी आता परवानगीची वाट पाहायची नाही, कोणाशी चर्चा करायची नाही, सरसकट दुकाने सुरू करायची, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

चौकट

प्रशासन काय करणार?

सकाळी ९ वाजता एकाचवेळी शहरातील सर्व दुकाने उघडल्यानंतर महापालिका प्रशासनास कारवाई करण्यावर मर्यादा येणार आहे. तरीही प्रशासन जादा मनुष्यबळाची व्यवस्था करून सरकारचा आदेश पाळण्यासाठी कारवाई करणार की हतबलतेच्या भूमिकेत राहणार, यासंबंधी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरातील बहुतांशी दुकानदारांनी अर्धा शटर उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तेही आता पूर्ण शटर उघडणार आहेत.

कोट

दीर्घकाळ दुकाने बंद असल्याने व्यापारी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. जिल्हा प्रशासनानेही सरसकट दुकाने सुरू करण्यासंबंधी सकारात्मक अहवाल सरकारकडे पाठवला आहे. पण सरकारला त्या प्रस्तावाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यामुळे शहरातील सर्व दुकाने आज, सोमवारपासून सकाळी ७ ते ४ यावेळेत सुरू राहतील.

संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

कोट

राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने शनिवारीच बैठक घेऊन सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्धार केला आहे. यानुसार राजारामपुरीतील सर्व दुकाने सुरू राहतील. कारवाईस जशास तसे उत्तर देत दुकानदार आपला व्यवसाय करतील. कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासंबंधीची काळजी घेण्यात येईल.

ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

कोट

गुजरीतील सर्व सराफ दुकाने सोमवारी सकाळी ९ वाजता उघडतील. त्याची संपूर्ण तयारी केली आहे. बैठक घेऊन सराफ व्यावसायिकांना माहितीही दिली आहे. आता फार दिवस दुकाने बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे सराफ संघानेही दुकाने उघडण्याचा निर्धार केला आहे.

कुलदीप गायकवाड, अध्यक्ष, सराफ संघ

Web Title: All the shops in the city will be opened from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.