कोल्हापुरातील सर्व दुकाने आजपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:17+5:302021-04-12T04:21:17+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने गेल्या आठवड्यात शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी रात्री आठ ते सकाळी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने गेल्या आठवड्यात शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत जमावबंदी लागू केली. त्यामध्ये दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करीत व्यापारी, व्यावसायिक रस्त्यांवर उतरले. त्यांनी आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. याबाबत कोल्हापूर चेंबरने संलग्नित संघटनांची शुक्रवारी (दि. ९) बैठक घेतली. त्यात कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुकाने सुरू होतील. सराफ व्यावसायिकांची दुकानेही सुरू होतील. कोरोनाबाबतच्या नियमांचे व्यापारी, व्यावसायिकांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याने कारवाई झाल्यास त्याला कोल्हापूर चेंबर जबाबदार राहणार नसल्याचे संजय शेटे यांनी सांगितले. सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्याला आमचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
मास्क असेल, तरच प्रवेश द्या
सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केल्यास त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहे. गुढीपाडव्यानंतर पूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यास तोपर्यंत आम्ही घेतलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून दुकाने सुरू केली जातील. व्यापारी, व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या दुकानांची संख्या : १ लाख २५ हजार
अत्यावश्यक सेवेतील दुकानांची संख्या : ५० हजार