कोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:59 PM2019-08-05T17:59:56+5:302019-08-05T18:05:12+5:30
रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.
कोल्हापूर : रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.
रुकडी येथील रेल्वेपुलाजवळ पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी धोका पातळीजवळ आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून मिरजेकडे आणि मिरजेहून कोल्हापूरकडे येणारी रेल्वेची वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद करण्यात आली. यामुळे कोल्हापुरात दररोज येणारी पाच पॅसेंजर, आठ एक्स्प्रेस कोल्हापुरात आलीच नाही.
मिरज येथून सोमवारी हरिप्रिया, कोल्हापूर-नागपूर, राणी चन्नम्मा, गोंदिया कोल्हापूर या गाडीची वाहतूक सुरू होती. पुणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रविवारी (दि. ४) महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्याने आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांनी पैसे परत घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर सोमवारी गर्दी केली. गाडी रद्द झाल्याने रेल्वे स्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ धोक्याच्या पातळीजवळ सुमारे १३ इंच पुराचे पाणी वाढल्याने ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
अनेक मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव १९ मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने या आगाराची वाहतूक बंद आहे. रविवारी (दि. ४) दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागातील १२०४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ४७०१२ किलोमीटरची वाहतूक झाली नाही. पन्हाळगडावर जाण्याचा रस्ता बंद असल्याने बुधवारपेठेपर्यंतच वाहतूक सुरु आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांची रेलचेल दिवसभर कमी होती. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, बेळगाव, आजरा, गडहिंग्लज या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरूहोती. कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीनपर्यंत सुमारे ४० टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. काही मार्गांवर प्रवासी संख्या कमी असल्याने गाड्या रिकाम्या धावत होत्या.
जोतिबाकडे भाविक कमी
श्रावणषष्ठीमुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोल्हापूर विभागाच्या वतीने जादा गाडीचे नियोजन केले होते; मात्र पावसामुळे भाविक बाहेर न पडल्याने या गाडीने गर्दी कमी होती. अगदी तुरळकपणे ही वाहतूक सुरू होती.