रुग्णालयावरील आरोप काही हेतूने : डॉ. कुडाळकर यांचे म्हणणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:13+5:302021-05-30T04:21:13+5:30
कोल्हापूर : पत्रकार परिषदेत करण्यात आलेले सर्व आरोप आम्ही फेटाळत असून निव्वळ बदनामी व इतर हेतूने हे आरोप करण्यात ...
कोल्हापूर : पत्रकार परिषदेत करण्यात आलेले सर्व आरोप आम्ही फेटाळत असून निव्वळ बदनामी व इतर हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत. खोट्या, ऐकीव माहितीच्या आधारे हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. सूरज कुडाळकर व डाॅ. स्मिता कुडाळकर यांनी दिला. ‘लोकमत’ने त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला होता.
डॉ. कुडाळकर म्हणाले, वडगावातील कुडाळकर हॉस्पिटल रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोरोना काळात शेकडो रुग्णांचे प्राण आम्ही वाचवले आहेत आणि आजही वाचवत आहोत. पण गेल्या काही दिवसापासून कुडाळकर कुटुंबीयांना आणि हॉस्पिटलला जाणीवपूर्वक बदनामी करून त्रास दिला जात आहे. आधी काही रुग्णांचे बिल कमी करण्याविषयी दबाव टाकण्यात आला. ते कमी करून दिल्यानंतर हॉस्पिटलमधील बायो वेस्टचा विषय करून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आता काही रुग्णांना घेवून आमच्याविषयी आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांचा हेतू काय आहे, हे वडगाव परिसरातील नागरिकांना चांगले माहीत आहे. आम्ही नियमानुसारच बिलाची आकारणी केली आहे. सरसकट सर्वांना सवलत देणे शक्य नाही.