सत्तारूढांमध्येच आरोप-प्रत्यारोप

By admin | Published: July 25, 2014 11:56 PM2014-07-25T23:56:39+5:302014-07-26T00:16:11+5:30

इचलकरंजी नगरपालिका सभा : शाब्दिक चकमक, ६९ विषयांचा फैसला

Allegations and references in the ruling | सत्तारूढांमध्येच आरोप-प्रत्यारोप

सत्तारूढांमध्येच आरोप-प्रत्यारोप

Next

इचलकरंजी : नगरपालिकेच्या सभेमध्ये सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांमध्येच वारंवार उडणारी शाब्दिक चकमक, आरोप-प्रत्यारोप यामुळेच सभा वादळी ठरली. नवनिर्वाचित नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच सभा स्मरणीय ठरली. तब्बल चार तास चाललेल्या सभेत ६९ विषयांवर निर्णय झाले.
सभेच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहून तयार नाही. सहा महिने उलटले, तरी इतिवृत्त सभेसमोर येत नसल्याबद्दलची तक्रार नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी, इतिवृत्त पूर्ण करण्याच्या प्रस्तावासाठी संबंधित सूचक-अनुमोदक नगरसेवक स्वाक्षऱ्या देत नाहीत. परिणामी इतिवृत्तास दिरंगाई होत असल्याचे सांगितले.
त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक २८, ३०, ३४, ३७, ४२, ४३, ४८, ५२, ५३, ५५, ५८, ६७, ६८ व ६९ या कागदपत्रांच्या फाईल नाहीत. फाईल नसतानाही सभेच्या विषयपत्रिकेवर विषय घेतले आणि त्या विषयांना मुख्याधिकाऱ्यांनी टिप्पणीसुद्धा कशाच्या आधारे दिली, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवक चोपडे यांनी हरकत घेतली. यावेळी सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त करीत हरकत घेतली. सुमारे अर्धा तास या विषयावर जोरदार चर्चा झाली आणि कागदपत्रांच्या फाईल नसलेले विषय पुढील सभेत घेण्याचे ठरविण्यात आले.
आयजीएम दवाखान्याकडे स्त्री रोगतज्ज्ञ प्रतिनियुक्तीवर मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणे, मोठे तळे ते टिळक पुतळा रस्ता रुंदीकरण, अनधिकृत बांधकामांना आणि औद्योगिक क्षेत्रातील पाणी जोडण्या, कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेची दाबनलिका अंशत: बदलणे, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी जागा, मध्यवर्ती एस. टी. बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे, पालिकेकडील सुलभ शौचालयाकडील कर्मचाऱ्यास मानधन देणे, पाणी टंचाई निवारणासाठी दोन कोटींची योजना, आयजीएम दवाखान्याकडे औषध खरेदीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद, लहान रस्ते-बोळ कॉँक्रिटीकरण, इमारती व सार्वजनिक शौचालये दुरुस्ती, गटार बांधणी अशा विषयांवर सभेत निर्णय झाले.
नगराध्यक्षा बिरंजे नवनिर्वाचित असूनसुद्धा त्यांनी पहिलीच सभा प्रभावीपणे हाताळली. सभेमध्ये उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, शशांक बावचकर, नगरसेविका सुनीता मोरबाळे, छाया पाटील, हेमलता आरगे, ‘शविआ’ चे तानाजी पोवार, सयाजी चव्हाण, सुप्रिया गोंदकर, महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, नितीन जांभळे, अशोकराव जांभळे, अब्राहम आवळे, संभाजीराव काटकर, आदींनी भाग घेतला.
(प्रतिनिधी)

-पाणी टंचाई निवारणासाठी दोन कोटी
-विषयांच्या फाईलच नसल्याची हरकत
-एस.टी.स्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
-आयजीएमसाठी एक कोटींची तरतूद

प्रभाग क्रमांक सहामधील तांबेकर-हाळवणकर घर ते हाळकूर किराणा स्टोअर्स या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नसल्याने संबंधित मक्तेदाराच्या अंतिम बिलाची रक्कम अदा करू नये, अशी लेखी हरकत त्याच प्रभागातील नगरसेविका सारिका धुत्रे यांनी घेतली आणि सभेत खळबळ उडवून दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेत, संबंधित प्रभागातील कामांसाठी नगरसेविकेला विश्वासात घेतले जात नाही, असा खुलासा झाल्यावर या विषयावर
पडदा पडला.

Web Title: Allegations and references in the ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.