चित्रपट महामंडळावरील आरोप बिनबुडाचे

By admin | Published: December 1, 2015 12:03 AM2015-12-01T00:03:08+5:302015-12-01T00:15:34+5:30

मिलिंद अष्टेकर : उपोषण मागे घेण्याची विनंती; सहा जानेवारीला घेणार महासभा

The allegations made against the film corporation are unimpressed | चित्रपट महामंडळावरील आरोप बिनबुडाचे

चित्रपट महामंडळावरील आरोप बिनबुडाचे

Next

कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सध्याच्या कार्यकारिणीने कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार केलेला नाही. कृती समितीचे आरोप बिनबुडाचे आहेत. आज, मंगळवारी होणारे उपोषण त्यांनी मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. महामंडळाची महासभा नव्या वर्षात ६ जानेवारीला होणार आहे. या सभेतच निवडणुकांची तारीखही जाहीर केली जाईल, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अष्टेकर म्हणाले, ७० ते ८० लाखांचा भ्रष्टाचार या कार्यकारिणीने केला, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर, हेमसुवर्णा मिरजकर यांनी केला आहे. हा आरोप बिनबुडाचा आहे. कारण धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली असून सर्व कार्यकारिणी सदस्यांचे जाबजबाब नोंदविले आहेत. त्याचबरोबर महामंडळाविषयीचा अहवालही आमच्या बाजूने दिला आहे. यापूर्वी माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यावरील ७ लाखांचा घोटाळ्याचा आरोपांबद्दल न्यायालयीन बाब फौजदारी व दिवाणी कोर्टात सुरू आहे. त्यातील साडेसहा लाख रुपये वसूलही केले आहेत. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा महामंडळाच्या बदनामीचा खटाटोप मेघराज राजेभोसले, आदी मंडळी करत आहेत.
आजचे उपोषण मागे घेण्याची विनंती आम्ही मंडळींनी केली होती. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. १० डिसेंबरला महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर येणार असून, त्यांच्याशीही समितीने चर्चा करावी. घोटाळा झाला असता तर २४ हजारांहून अधिक सदस्य गप्प बसले असते का, असा सवालही त्यांनी केला. यावेळी प्रमुख कार्यवाह सुभाष भुरके, खजानिस सतीश बिडकर, संचालक इम्तियाज बारगीर, बाळू बारामती, व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर उपस्थित होते.


सुरेंद्र पन्हाळकर यांची धमकीची तक्रार
सोमवारी दुपारी तीन वाजता महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना ‘आमची काही बदनामी झाली तर आम्ही कोणालाच सोडणार नाही, हाणामाऱ्या होतील, तेव्हा हे थांबवा ’, अशी फोनवरून धमकी दिली. यावर राजेभोसले यांनी आम्ही सनदशीर मार्गाने उपोषण करत असल्याचे सांगितले. या धमकीचा गांभीर्याने विचार करून आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी पन्हाळकर यांनी जुना राजवाडा पोलिसांत केली आहे. यामध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी हे ८३ वर्षांचे आहेत. याशिवाय नलवडे, सांगावकर, मिरजकर, मोरबाळे या सदस्यांना शारीरिक धोका पोहोचविण्याचा संभव आहे. तरी उपाययोजना करण्याची मागणी पन्हाळकर यांनी केली आहे.

उपोषण करणारच : राजेभोसले
महामंडळासमोरील उपोषण कुठल्याही परिस्थितीत आम्ही करणार, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The allegations made against the film corporation are unimpressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.