आरोप-प्रत्यारोपांमुळे रंगत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:09+5:302021-01-10T04:18:09+5:30
संदीप बावचे : शिरोळ गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ ...
संदीप बावचे : शिरोळ
गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ कारभार करणार, शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना राबविणार, मजुरांना शासन स्तरावरील सोयी व योजनांचा लाभ देणार, अशा घोषणांचा पाऊस सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात पहावयास मिळत आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी चालविला आहे. मतदारांच्या दारात घोषणापत्रे पोहोचवली जात आहेत. बहुतांशी ग्रामपंचायतींनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील तेच ते मुद्दे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे परिवर्तन, तर कुठे ग्रामविकास आघाडी अशा नावाने पॅनलची बांधणी करून गावपुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरविले आहे. तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचे कारभारी येत्या १८ जानेवारीला ठरणार आहेत. दानोळीसह दत्तवाड, नांदणी, शिरढोण, यड्राव, उदगाव यासारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये तालुक्याच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची सर्वतोपरी तयारी सुरू आहे.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मागील पाच वर्षांत कोणती कामे केली, शासनाच्या कोणत्या योजना राबविल्या, असे सांगितले जात आहे, तर विरोधी गटाकडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करून गेल्या पाच वर्षांत गावाच्या विकासापेक्षा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही गावचा संपूर्ण विकास करू, असे देखील आश्वासन विरोधी गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.
दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतीमुळे उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करीत आहेत. यात सत्ताधारी सत्ता टिकविण्यासाठी, तर विरोधक परिवर्तन करण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. एकूणच उमेदवारांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडत असला तरी सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार की परिवर्तन होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.