इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे कोल्हापुरात युती - आघाडीत बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:41 PM2019-06-30T23:41:56+5:302019-06-30T23:42:01+5:30

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती ...

Alliance in Kolhapur due to the brotherhood of the inclinations - Alliance in front is inadmissible | इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे कोल्हापुरात युती - आघाडीत बंडखोरी अटळ

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे कोल्हापुरात युती - आघाडीत बंडखोरी अटळ

googlenewsNext

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढती होतील, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती, काँग्रेस आघाडीमध्येही बंडखोरी अटळ दिसत आहे. या मतदारसंघातील तब्बल १५ उमेदवार लढतीसाठी शड्डू मारून तयार आहेत.
लोकसभेला दोन्ही जागा जिंकून हवा निर्माण केलेल्या शिवसेनेपुढे हे यश कायम राखण्याचे आव्हान आहे. काँग्रेसला नव्याने खाते उघडताना, तर राष्ट्रवादीला सध्या आहे त्या जागा कायम राखताना ताकद पणाला लावावी लागणार आहे. काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीने नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले असले तरी या जिल्ह्यात मात्र दहाही मतदारसंघांत विद्यमान विरुद्ध प्रस्थापित अशीच लढत होणार आहे. नवा चेहरा इच्छुकांच्या यादीत असला तरी ते प्रस्थापित कुटुंबातीलच आहेत.
गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली तरी त्याचा फायदा शिवसेनेला झाला व या पक्षाचे तब्बल सहा आमदार निवडून आले. या यशात त्या पक्षापेक्षा स्थानिक परिस्थिती व उमेदवाराचा प्रभावही तितकाच महत्त्वाचा राहिला. हे शिवसेनेचे निर्भेळ पक्षीय यश नव्हे. कारण तसे असते तर त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूरने शिवसेनेला म्हणावे तेवढे यश दिले नाही. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर शिवसेनेला यश मिळाले असले तरी तीच हवा कायम राहण्याची शक्यता नाही; कारण विधानसभेला स्थानिक प्रश्न, उमेदवाराबद्दलची आत्मीयता, गटातटांचे राजकारण असे अनेक घटक उफाळून येतात, तसे ते या निवडणुकीतही येणार आहेत. सध्या आमदार असलेल्या दहांपैकी कुणाचीच उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता नाही. त्याशिवाय काँग्रेसमधून आमदार सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), राजूबाबा आवळे (हातकणंगले), जनसुराज्य पक्षातून विनय कोरे (शाहूवाडी) व राजीव आवळे (हातकणंगले) यांची उमेदवारी नक्की मानली जाते. त्यानुसार त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी, प्रचारही सुरू केला आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि इचलकरंजी येथे दुरंगी लढतीचे चित्र आहे. उर्वरित सहा ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.
उमेदवारीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून दोन्ही काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तिथे मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील व व्ही. बी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात ताकदीचा उमेदवार देण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे; परंतु अजून ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार व उमेदवार कोण हे ठरता ठरेना झाले आहे. असेच त्रांगडे आघाडीच्या उमेदवारांबाबत शिरोळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी संघटना या पक्षांकडे तगडे उमेदवार आहेत. स्वाभिमानी संघटना दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे आणि शिरोळ हा संघटनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीसमोर पेच आहे. भाजप-शिवसेना युतीपुढे असाच तिढा कागल व चंदगड मतदारसंघांत आहे. कागलमध्ये भाजपकडून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे; परंतु शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे हेदेखील इच्छुक आहेत. चंदगडमध्ये भाजपकडून रमेश रेडेकर, गोपाळराव पाटील, तर शिवसेनेतून राजेश पाटील, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे तयारी करीत आहेत. त्यांच्यात कसा समझोता घडवून आणायचा, हेच युतीपुढे आव्हान आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे भाजप आघाडीचे घटक असले तरी त्यांना शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे आव्हान असेल. राष्ट्रवादीत राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीसाठीच रस्सीखेच आहे. या मतदारसंघात भाजपमधून राहुल देसाई यांची बंडखोरी असेल.


गत निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार
काँग्रेस- ०५, राष्ट्रवादी- ०२, शिवसेना, जनसुराज्य व अपक्ष प्रत्येकी- ०१
सर्वांत मोठा विजय : राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना) - ३९४०८ (पराभव : के. पी. पाटील, राष्ट्रवादी)
सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : शाहूवाडी-विनय कोरे (जनसुराज्य)- ३८८ (विजयी : सत्यजित पाटील - शिवसेना)

सध्याचे पक्षीय बलाबल
शिवसेना : 06
भाजप व राष्ट्रवादी : प्रत्येकी 02

Web Title: Alliance in Kolhapur due to the brotherhood of the inclinations - Alliance in front is inadmissible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.