Kolhapur politics: ‘बिद्री’, ‘भोगावती’त वस्त्रहरण; आता लोकसभेला एकीचे तोरण
By राजाराम लोंढे | Published: December 7, 2023 01:25 PM2023-12-07T13:25:05+5:302023-12-07T13:27:46+5:30
नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, कार्यकर्त्यांची दुभंगलेली मते जुळणार?
राजाराम लोंढे
कोल्हापूर : सहकारात राजकीय पक्षांची मर्यादा नसली तरी ‘बिद्री’, ‘भोगावती’ व होणाऱ्या ‘आजरा’ साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे वस्त्रहरण करणारे नेते येत्या तीन महिन्यांत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांचे गुणगान गाणार आहेत. हा राजकारणाचा भाग असला तरी लोकसभेला महायुती व महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या आणाभाका काही जणांनी घेतल्या तरी या निवडणुकांमुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने जुळणार कशी, हे पाहणे महत्त्वाचे असून कारखान्यांच्या निवडणुकीतील पैरा फेडण्यासाठी एकमेकांना पूरक अशीच भूमिका आगामी घेतली जाणार, हे निश्चित आहे.
राज्यातील सत्ता नाट्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), जनसुराज्य पक्ष आदींची महायुतीची मोट अधिक घट्ट झाली. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी महाविकास आघाडी कमकुवत वाटते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात ही समीकरणे घडवून आणली. मात्र, नवीन समीकरणानंतरच्या पहिल्याच ‘भोगावती’, ‘बिद्री’ व ‘आजरा’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोयीची भूमिका घेत घरोबा केला.
सहकार संस्थांमध्ये पक्षीय राजकारण नसते, असे जिल्ह्याचे नेते सांगत असले तरी या कारखान्यांच्या निवडणुकीचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटणार आहेत. ‘भोगावती‘ व ‘बिद्री’ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांचे वस्त्रहरण केले. ‘महायुती’चे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विरोधात पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील होते. महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील सांगतील तोच उमेदवार असणार आहे.
मात्र, आमदार हे महायुतीच्या नेत्यांसोबत होते. ‘भोगावती’मध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे एकत्र होते. विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मोट होती. ‘शेकाप’चे उमेदवार तिन्ही पॅनलमध्ये होते. या विचित्र आघाड्यांमुळे कारखान्यांचा सभासद गोंधळलेला होताच; पण त्यानंतर सामान्य मतदार बुचकळ्यात पडला आहे. ‘आजरा’ कारखान्यात आमदार सतेज पाटील व आमदार विनय काेरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भाजप एकत्र आला आहे. येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधात दंड थोपटले आहेत.
खोलवर परिणाम
तिन्ही कारखान्यातील विचित्र आघाड्या नेत्यांना सोयीच्या वाटत असल्या तरी त्याचे खोलवर परिणाम होणार आहेत. या भूमिकेचा फटका कोणाला बसणार, हे जरी काळ सांगणार असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कोण कोठे जरी असले तरी एकमेकांना पूरक (पडद्याआडून का असेना), अशीच भूमिका दोन्ही आघाड्यातील नेते घेणार, हे निश्चित आहे.
या तालुक्यांतील राजकारण ढवळून निघाले..
करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, कागल.