महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Published: March 24, 2015 12:03 AM2015-03-24T00:03:08+5:302015-03-24T00:11:08+5:30
ड्रेनेजप्रश्नी आंदोलन : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेविकेसह दोघांना नोटिसा
सांगली : सांगलीवाडी येथील ड्रेनेजच्या कामावरून नगरसेविका वंदना कदम यांचे पती सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीवाडीतील काही नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आज (सोमवारी) हल्लाबोल केला. अधिकाऱ्यांना घेराव घातला. एका कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला. आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर नगरसेविका कदम व त्यांचे पती सचिन कदम या दोघांना आयुक्तांनी नोटीसवजा पत्र दिले. यापुढे असे प्रकार घडले, तर कारवाईचा इशारा पत्राद्वारे दिला आहे. सांगलीवाडी येथील ड्रेनेज योजनेची मंजूर कामे रद्द करून ती नगरसेवकांच्या इशाऱ्याने अन्य भागात वळविण्यात आल्याची टीका करीत सचिन कदम व त्यांच्या सांगलीवाडीतील समर्थकांनी हिराबाग येथील पाणीपुरवठा केंद्रावर हल्लाबोल केला. मोर्चाने दाखल झाल्यानंतर पाणीपुरवठा अधिकारी जे. व्ही. गिरी यांच्या दालनात त्यांनी मोर्चा वळविला व त्यांना घेराव घातला. अधिकाऱ्यांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. तरीही समर्थक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका संतप्त समर्थकाने गिरी यांना शिवीगाळ केली. त्यामुळे वातावरण तापले. याप्रश्नी लगेच निर्णय न घेतल्यास दालनाबाहेर पडू न देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. महापालिका आयुक्तांना याची माहिती मिळताच त्यांनी उपायुक्त प्रशांत रसाळे आणि सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांना पाणीपुरवठा विभागात पाचारण केले. दोन्ही अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. दोन नगरसेवकांमधील या वादामुळे अधिकारी वेठीस धरले गेल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीवाडीत इस्लामपूर रस्ता व समडोळी रस्ता अशा दोन ठिकाणी २२00 मीटर ड्रेनेजचे काम मंजूर आहे. त्यानंतर धरण रस्ता व अन्य भागातील १६00 मीटर रस्त्याचेही अतिरिक्त काम मंजूर करण्यात आले आहे. सांगलीवाडीतील दत्तनगर येथेही ड्रेनेजचे काम करावे, अशी मागणी कदम यांनी केली होती. इस्लामपूर रस्त्यावरील मंजूर काम रद्द करून नगरसेवक दिलीप पाटील यांनी हे काम आपल्या भागात पळविल्याची तक्रार कदम दाम्पत्याने केली आहे.
दुसरीकडे दिलीप पाटील यांनी, मंजूर कामे रद्द केली नसल्याचे सांगत, तसे पुरावे सादर करावेत, अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांकडून लेखी पत्र
पाणीपुरवठा अधिकारी गिरी आणि जलनिस्सारण अधिकारी एस. जी. कुलकर्णी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आयुक्तांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संबंधित आंदोलनकर्त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. निर्णय झाला नाही, तर अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आम्हाला महापालिकेत काम करणे मुश्किल झाले आहे. अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात.
सांगलीवाडीतील एका आंदोलनकर्त्याने रॉकेलचा कॅन आणला होता. त्याने आत्मदहनाचा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर त्याला समजावण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
दोघांना नोटिसा
अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली. त्यांनी तातडीने नगरसेविका व त्यांचे पती सचिन कदम यांना सूचनावजा पत्र दिले. अशाप्रकारची भाषा अधिकाऱ्यांना वापरून त्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. दम देणे अयोग्य असल्याने नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.