‘रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:09 AM2021-01-31T06:09:42+5:302021-01-31T06:10:11+5:30
Raigad News : पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून आणि बाहेरूनही अनेक शिवभक्त येत असतात. मात्र, सध्या या ठिकाणी अनेक कामे सुरू असल्यामुळे त्यांना राजसदरेवर जाऊ दिले जात नाही. परंतु, काही नियम करून त्यांना राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी आपण केल्याची माहिती खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिली.
संभाजीराजे म्हणाले, पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. चित्त दरवाजाच्या प्रदर्शनीय भागाचे काम प्राधिकरणामार्फत चुना, दगड, सुर्खी व बेलफळ या पारंपरिक बांधकाम साहित्याने पूर्ण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाने चित्त दरवाजा येथे तात्पुरत्या स्वरूपात तिकीट खिडकी सुरू केली आहे. या खिडकीच्या दृश्य स्वरूपाबद्दल शिवभक्त व पर्यटकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांना माहिती देण्यात आली आहे. खिडकीचे दृश्य स्वरूप ऐतिहासिक पद्धतीचेच असावे, अशा सूचनाही केल्या आहेत.
राजसदरेवर लावलेले बॅरिकेड्स तत्काळ काढावेत यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, अद्याप त्याबाबत उत्तर मिळाले नसल्याचे सांगितले.