सर्व आस्थापना सुरू करण्यास परवानगी द्या : प्रभारी जिल्हाधिकारी बलकवडे यांची शासनास विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:23+5:302021-07-03T04:17:23+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गेल्या दोन आठवड्यांतील कोरोनाबाधितांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने, ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गेल्या दोन आठवड्यांतील कोरोनाबाधितांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना यांच्यासह इतर सर्व आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू करण्याचे आदेश शासनस्तरावर पारित करावेत, अशा प्रकारची विनंती शुक्रवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राज्य शासनाला केली.
कोल्हापूर शहरातील सरसकट सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी व्यापारी, दुकानदार यांच्याकडून होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे निवेदनही दिले होते. त्यामुळे शासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झालेल्या होत्या.
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी शुक्रवारी राज्य सरकारला पाठविलेले विनंतीपत्रच आता शहरातील सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बलकवडे यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून सरसकट सर्वच दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. महानगरपालिका हद्दीतील मागील दोन आठवड्यांतील सरासरी बाधितांची टक्केवारी ही आरटीपीसीआर टेस्टनुसार १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे विनंतीपत्रात नमूद केले आहे.