हालेवाडीच्या भैरीदेव मंदिराच्या बांधकामास परवानगी द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:24+5:302021-08-23T04:26:24+5:30
उत्तूर : हालेवाडी (ता. आजरा) येथील भैरीदेव मंदिर बांधकाम प्रकरणात प्रशासनास वेगवेगळी माहिती देऊन मंदिराचे काम थांबवण्याचे काम कोणा ...
उत्तूर :
हालेवाडी (ता. आजरा) येथील भैरीदेव मंदिर बांधकाम प्रकरणात प्रशासनास वेगवेगळी माहिती देऊन मंदिराचे काम थांबवण्याचे काम कोणा एकाच्या तक्रारीवरून होत असेल आणि स्वत: आत्महत्या करण्याचा इशारा देत असतील तर आम्हालाही सामूहिक आत्मदहन करण्यास परवानगी द्या, अशी मागणी पोलीस प्रशासनास ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.
गावातील मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करा, अन्यथा मंदिरात दोरीने गळफास लावून आत्महत्या करीन असे निवेदन चंद्रकांत वसंत पाटील या युवकाने दिला होते. त्याची दखल घेत मंदिराचे बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे.
मंदिराचे काम बंद व पोलिसांनी मंदिर परिसरात येण्यास अटकाव केल्याने गेले आठ दिवस गावात तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने मंदिराकडे येत असताना पोलिसांनी अटकाव केला. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवून घेतल्याने गावात तणावपूर्ण वातावरण होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्यासमोर मंदिराची कैफियत मांडताना ग्रामस्थ आक्रमक झाले.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले, आम्हाला मंदिराचे काम पूर्ण करू द्या. जुन्याच जागेवर मंदिराचे काम सुरू आहे. तक्रारदाराने न्यायालयीन आदेशाचा चुकीचा अर्थ काढून प्रशासन व ग्रामस्थ यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. बांधकाम १०० वर्षांपूर्वीचे असल्याने जीर्ण झाले होते. मंदिर हे गावाचे आहे, तशी रीतसर नोंदीही आहेत.
आम्हाला बांधकाम पूर्ण करून मूर्ती प्रतिष्ठापना करू द्या अशी आमची विनंती आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
यावेळी सरपंच बनूताई शिंदे, मानसिंग खोराटे, संग्राम आपके, संदीप पाटील यांनी कागदपत्राची माहिती दिली. कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २३) १२ वाजता ग्रामस्थांसोबत बैठक होणार आहे.
----------------------
चार तास मंदिर परिसरात ठिय्या
मंदिराचे काम पूर्ण करण्यास बंदी केल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी होती. मात्र, चार तास स्त्री-पुरुषांनी शांततेत ठिय्या मांडून पोलीस प्रशासनाला आपली धार्मिक भावना समजावून सांगितली अन् पोलिसांना सहकार्य केले.
भाऊरायांना राख्या बांधूया, प्रश्न सोडवूया
गावचा धार्मिक प्रश्न असल्याने गावकरी सर्वजण मंदिराकडे गेले होते. सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने रक्षाबंधन सण साजरे करू शकले नाहीत. प्रथम सर्व महिलांनी बंदोबस्तावरील पोलिसांना राख्या बांधल्या. भाऊराया आमचा प्रश्न सोडवा, अशी विनंती केली. चार तासांनंतर गावकऱ्यांनी रक्षाबंधन सण घरी जाऊन साजरा केला.
-------------------------
फोटो ओळी : हालेवाडी (ता. आजरा) येथे मंदिर प्रश्नाबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना निवेदन देताना ग्रामस्थ.
क्रमांक : २१०८२०२१-गड-०६
फोटो ओळी :
हालेवाडी (ता. आजरा) येथे भैरीदेव मंदिर परिसरात जमलेले ग्रामस्थ.
क्रमांक : २१०८२०२१-गड-०७
फोटो ओळी : (आय विटनेससाठी)
हालेवाडी (ता. आजरा) येथील मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांना राखी बांधताना सरपंच बनाताई शिंदे. (रवींद्र येसादे)
क्रमांक : २१०८२०२१-गड-०८