पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला परवानगी द्या
By admin | Published: April 28, 2016 11:24 PM2016-04-28T23:24:33+5:302016-04-29T00:37:45+5:30
केंद्रीय मंत्र्यांची ‘पुरातत्त्व’ला सूचना : धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाबाबत नागरिकांतून उद्रेक होत असतानाच खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी मंत्री शर्मा यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून पुलाच्या बांधकामाला परवानगी देण्याबाबत सूचना केल्या. तसेच महिन्याभरात या पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत पुरातत्त्व खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, असेही त्यांनी अभिवचन दिले. त्यामुळे हा नवा पर्यायी शिवाजी पूल लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
शिवाजी पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलाचे बांधकाम ८० टक्के पूर्ण होऊनही काही महिने काम रखडले आहे. पुलाच्या बांधकामामध्ये अडथळा ठरणारा शाहूकालीन हौद आणि पुरातत्त्व खात्याचे ब्रह्मपुरी परिसरात लागू असलेले निर्बंध, यामुळे पुरातत्त्व खात्याकडून ना हरकत दाखला मिळाला नसल्यामुळे पुलाचे बांधकाम ‘जैसे थे’ आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पुरातत्त्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची भेट घेवून नियमानुसार बांधकामाला परवानगी देणे शक्य नसले तरी जनहितार्थ मुद्यावर खास बाब म्हणून नव्या पर्यायी पुलाला पुरातत्त्व खात्याने परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार मंत्री शर्मा यांनी, पुरातत्त्व खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुलाच्या बांधकामाला परवानगी देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे कोल्हापूर ते पन्हाळा या मार्गावरील शहरालगतच्या नव्या पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला पुरातत्त्व खात्याकडून निश्चितच ना हरकत प्रमाणपत्र महिन्याभरात मिळेल, असे अभिवचन मंत्री शर्मा यांनी यावेळी खासदार महाडिक यांना दिले.
कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावरील वाढलेली वाहतूक, सध्याच्या शिवाजी पुलाचे शंभर वर्षांहून अधिक झालेले आयुर्मान आणि जनभावना लक्षात घेऊन हा पूल लवकरात-लवकर पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.