सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:43 PM2020-11-02T16:43:23+5:302020-11-02T16:45:35+5:30
collectoroffice, morcha, kolhapurnews लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांकरीता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांकरीता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
कोरोनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांशी संबंधित असणारे मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन आदी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. व्यावसायिक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ व्यावसायिकांना परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
यासाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महापौर निलोफर आजरेकर,नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील,उपमहापौर संजय मोहीते,आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी एक उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मागण्या अशा,
- पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी द्या.
- व्यावसायिकांना १८ टक्के ऐवजी ५ टक्के जीएसटी आकारावा.
- लाईट बिले, भाडे, कर्जावरील व्याज माफ करा.
- उद्योगाचा दर्जा द्यावा
डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
बँडपथकासह बेंजो, नाशिक ढोल, हलगी , तुतारी, ताशा, फुलवाले, सजवलेले रथ, घोडे, आदी संघटनांचे व काम करणारे असे एक हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या आंदोलकांनी काळ्या रंगाचे टि-शर्ट परिधान केले होते. मोर्चात एक हजारांहून अधिक स्त्री पुरुष सहभागी झाले होते. त्यामुळे अक्षरश: सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.