कोल्हापुरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:41+5:302021-07-01T04:17:41+5:30
कोल्हापूर : शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येऊनही व्यापार सुरळीत सुरू होत नाहीत. यामुळे व्यापारी बंधू आणि प्रशासन यांच्यात तणावाचे ...
कोल्हापूर : शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येऊनही व्यापार सुरळीत सुरू होत नाहीत. यामुळे व्यापारी बंधू आणि प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोल्हापूर शहराकरिता स्वतंत्र युनिट करून सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून केली.
कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश पुन्हा चौथ्या टप्प्यात करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा सध्या अनलॉक स्थितीत आहे. गेले अनेक महिने व्यापार बंद असल्याने व्यापारी मेटाकुटीला आले असून, त्यावर अवलंबून असणारे कामगार व इतर घटकांचेही जगणे मुश्कील झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण आदी परिसराचा केंद्रबिंदू कोल्हापूर आहे. सीपीआरसह इतर सरकारी व खासगी वैद्यकीय सेवा चांगल्या व माफक दरात उपलब्ध असल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शहरात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परराज्यातील रुग्णही कोल्हापुरात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी आणि इतर जिल्हे आणि परराज्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाल्यानेही कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसत असल्याकडे क्षीरसागर यांची लक्ष वेधले.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी, जिल्हा प्रशासनाकडून अहवाल तातडीने मागविण्यात आले असून, याबाबत शासन सकारात्मक निर्णय देऊन व्यापारी वर्गास दिलासा देईल, असे सांगितले.
मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील - क्षीरसागर
शिवसेना नेहमीच व्यापारी बांधवांच्या पाठीशी ठाम उभी राहिली असून, कोल्हापुरातून सुरू झालेल्या एल.बी. टी.चा लढा राज्यव्यापी बनला. त्यातून न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कोरोना परिस्थितीतही व्यापारी बांधवांच्या सोबत असून, राज्य शासनाशी समन्वय साधून तत्काळ मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.