गांधीनगर व्यापारीपेठेसह १४ गावांतील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:48+5:302021-07-07T04:28:48+5:30
गांधीनगर : गांधीनगर व्यापारीपेठेसह कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणातील करवीर तालुक्यातील १४ गावांचे व्यापार सरसकट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी ...
गांधीनगर : गांधीनगर व्यापारीपेठेसह कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणातील करवीर तालुक्यातील १४ गावांचे व्यापार सरसकट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशनतर्फे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून गांधीनगर व्यापारी पेठ बंद आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व्यापार बंद ठेवले आहेत. प्रशासनाकडे व्यापार सुरू करण्याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरीही दुकाने सुरू करण्याबाबत व्यावसायिकांना प्रशासनाकडून कोणते आदेश मिळाले नाहीत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र व कोल्हापूर शहर नागरी विकास प्राधिकरण या दोन्ही क्षेत्रांतील शासनाच्या सर्व अटी व नियम जवळपास समान आहेत. असे असतानाही फक्त कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे गांधीनगर परिसरातील व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. येथील व्यावसायिकांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. हे अरिष्ट दूर करण्यासाठी सरसकट व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ऊर्फ पप्पू अहुजा, उपाध्यक्ष अशोक टेहलानी, रिटेल कापड असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, राजू नरसिंघानी, अमित कट्यार, विनोद अहुजा, हरिराम सेवलानी, संतोष अहुजा, आदी होलसेल व रिटेलचे व्यापारी उपस्थित होते.