घळभरणीच्या ठिकाणी आत्महत्येस परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:18+5:302021-03-04T04:44:18+5:30
उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी ...
उत्तूर : आंबेओहोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करतो, असे धरणग्रस्तांच्या बैठकीत आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन न होता घळभरणीस परवानगी कोणी दिली? असा थेट सवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून धरणग्रस्तांनी केला आहे.
घळभरणी सुरू झाल्याने धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर येथे जाऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे, ‘आधी पुर्नवसन मगच... धरण‘ असा कायदा असताना घळभरणीस परवानगी कोणाची घेतली याचा खुलासा करावा. आपण परवानगी दिली नसेल तर चालू असलेल्या कामाला अनुसरून संबंधित ठेकेदार, पाटबंधारेचे अधिकारी व इतर जबाबदार लोकांवर तत्काळ कारवाई करून धरणाचे काम थांबवावे, पुनर्वसनाअभावी घळभरणी पूर्ण झाली तर जिवंतपणी धरणग्रस्त मरतील; त्यापेक्षा आम्हाला इच्छामरणास परवानगी द्यावी अथवा घळभरणीमध्ये आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सचिन पावले, अशोक पावले, संदीप पुंडपळ, शंकर पावले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, पुनर्वसन मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.