आजपासून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्या : ललित गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:56+5:302021-07-12T04:16:56+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर ...
कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू राहिला. या कालावधीत कोरोना रूग्णांची संख्या वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने कोरोनाचा संसर्ग वाढत नाही, हे व्यापाऱ्यांचे म्हणणे खरे ठरले आहे. म्हणून आज (सोमवार)पासून आमचे सर्व व्यापार सुरू राहतील. त्याला सरकारची परवानगी मिळालीच पाहिजे, असे प्रतिपादन राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची विशेष बैठक रविवारी सायंकाळी असोसिएशनच्या कार्यालयात झाली. या बैठकीत गांधी बोलत होते. ते म्हणाले, प्रायोगिक परवानगीची मुदत शुक्रवारी दुपारी चार वाजता संपल्यानंतर सोमवारपासून पुन्हा व्यापार सुरू करण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सर्व व्यापारी आहेत. या परवानगीसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आदी विविध मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र चेंबरच्यावतीने निवेदनही दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण प्रत्यक्षात परवानगीचा आदेश निघालेला नाही, असे व्यापाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडत आहे. तरीही व्यापाऱ्यांनी सोमवारपासून आपले व्यापार सुरू करण्याची तयारी केलेली आहे.
या बैठकीला सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजिनदार अनिल पिंजानी, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, प्रितेश दोशी, स्नेहल मगदूम, अतुल लोंढे, शाम बासराणी, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, आदी संचालक उपस्थित होते.