एक मेपासून मतदान केंद्रावर लसीकरणास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:05+5:302021-04-23T04:27:05+5:30
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. संभाव्य गर्दी ...
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदान केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेतर्फे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे गुरुवारी केली.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, तर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील सर्व नागरिकांचा समावेश होता. त्यानंतर १ एप्रिल २०२१ पासून शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचा यात समावेश करण्यात आला. आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सद्यस्थिती पाहता, सर्व केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग नागरिकांकडून पाळले जाणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदान केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली, तर गर्दी होणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव गुरुवारी प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी सादर केला.