कार्यकर्त्यांना मुभा की नेत्यांचे राजकारण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:04+5:302020-12-16T04:38:04+5:30
संदीप बावचे / लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान ...
संदीप बावचे / लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, गटातटांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्याची नेतेमंडळी या निवडणुकीत कोणती राजकीय भूमिका घेतात, यावरच स्थानिक आघाड्यांची रणनीती ठरणार असून, कार्यकर्त्यांना मुभा की नेत्यांचे राजकारण, अशी चर्चा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली आहे.
तालुक्यातील अर्जुनवाड, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, चिपरी, दत्तवाड, यड्राव, शिरदवाड, शिरढोण, धरणगुत्ती या प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. ३३ ग्रामपंचायतींपैकी १२ ठिकाणी महिला सरपंच आरक्षण पडणार आहे. त्यातच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याने बहुमतासाठी स्थानिक आघाड्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अंतिम मतदार यादी निश्चित झाल्यामुळे इच्छुकांकडून प्रभागनिहाय मतदारांची गणिते घातली जात आहेत.
राज्यातील सत्तास्थापनेनंतर तालुक्यातील राजकारणात फेरबदल झाले आहेत. तालुक्यात काँग्रेससह शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व यड्रावकर गट अशा प्रमुखांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक ही स्थानिक गटातटांवर लढविली जात असते. मात्र, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या तरी दिसत नसल्याचे चित्र आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी व्यूहरचना वरिष्ठ पातळीवर राबविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या तरी ‘स्वाभिमानी’ने उदगाव येथे बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. स्थानिक पातळीवर आघाड्या कशा होतात, याकडे लक्ष लागले आहे; तर ५२ पैकी ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
--------------
चौकट
नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत; तर वर्षभरानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत. माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, अनिल यादव, आदी नेतेमंडळी कशी व्यूहरचना आखतात, यावरच स्थानिक आघाड्यांची रणनीती ठरणार आहे.